खेड तालुका ई-ग्राममध्ये राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:19 AM2018-08-07T01:19:31+5:302018-08-07T01:19:44+5:30
ग्रामपंचयातींचे काम ‘स्मार्ट’ आणि पेपरलेस होण्याच्या दृष्टीने तसेच सर्व ग्रामपंचायतींच्या कामकाजात एकसूत्रता व सूचीबद्धता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली आहे.
पुणे : ग्रामपंचयातींचे काम ‘स्मार्ट’ आणि पेपरलेस होण्याच्या दृष्टीने तसेच सर्व ग्रामपंचायतींच्या कामकाजात एकसूत्रता व सूचीबद्धता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यासाठी ई-ग्राम सॉफ्ट संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या संगणकप्रणालीद्वारे खेड तालुक्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले असून पूर्णपणे पेपरलेस होणारा खेड तालुका राज्यातील पहिला ठरला आहे.
प्रशासकीय कारभार अधिक वेगवान करण्यासाठी तसेच राज्यातील सर्व ग्रामपंचायती संगणकीकृत करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचा ग्रामविकास विभागाची योजना आहे. यासाठी ई-ग्राम सॉफ्ट संगणकप्रणाली विकसित केली आहे. ज्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यास व वरिष्ठांना आवश्यक ते सर्व अहवाल सादर करण्यासाठी मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीचा टप्पा म्हणून खेड तालुक्यात हा प्रकल्प राबविण्याचे ठरले.
खेडचे गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार आणि सर्व ग्रामसेवकांनी याला प्रतिसाद देत सर्व दप्तर ई-ग्राम सॉफ्ट या प्रणालीमध्ये संगणकीकृत केले आहे. यामुळे ग्रामपंचयातीची कार्यालये हायटेक झाली आहेत.
>ई-ग्राम सॉफ्ट संगणकप्रणालीत तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींची कागदपत्रे या प्रणालीत अपलोड करण्यात आली आहेत. यामुळे खेड तालुक्यातील ग्रामपंचायती या कामकाज कागदरहित करण्यात जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यात अव्वल ठरला आहे. तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार आपले सरकार सेवा केंद्र - केंद्रचालकांच्या मदतीने ही कामगिरी पूर्ण केली आहे.
>राज्यामध्ये ई-ग्राम प्रणालीमध्ये खेड तालुक्याने सर्व ग्रामपंचायतीचे १ ते ३३ गावनमुने संगणकीकृत करत राज्यात पहिला क्रमांक मिळविला. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आणि गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार आणि सर्व ग्रामसेवकांची मोलाची भूमिका आहे. त्यांच्या या कामाची दखल त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात येणार आहे.
- सूरज मांढरे,
मुख्य कार्यकारी अधिकारी