खेड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पुरवठा खंडित, शेतातील पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:03 PM2020-05-12T19:03:29+5:302020-05-12T19:06:21+5:30
चक्रीवादळात वीज पुरवठा खंडित, घरांचे नुकसान
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागात(सोमवारी दि.११) रोजी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. वादळांतर तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, चक्रीवादळामुळे मंदोशी, शिरगाव, टोकावडे, मोरोशी, कारकुडी, धुवोली, वांजळे, पाभे आदी परिसरात वादळी पाऊस झाला. यात घरांसह शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जावळेवाडी चारही बाजूने डोंगरात असल्याने चक्रीवादळात शेतकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.
मंदोशी (ता. खेड) येथील जावळेवाडी मधील १५ पेक्षा जास्त घरांचे अवकाळी वादळी पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने आदिवासी भागातील कुटुंबांना पुढील काही दिवस अंधारात काढावे लागणार आहेत. अगोदरच अनेक संकटाने ग्रस्त असलेल्या या आदिवासी वाडीवर अवकाळी संकट आले आहे.
याबाबत जावळेवाडीचे सरपंच बबन गोडे म्हणाले,मंगळवारी दुपारी अचानक जोरदार चक्री वादळ आले. या वादळात अनेक ग्रामस्थांच्या घराचे पत्रे हवेत दूरवर उडून गेले. विजेच्या तारांवर ते पडले गावाला वीज पुरवठा करणारे विजेचे सहा खांब पडल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. पडलेले खांब तात्काळ उभे करून वीज पुरवठा सुरळीत करावा, लॉकडाऊन असल्याने नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडे वादळात नुकसान झालेल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महसूल विभागाने या कुटुंबाला तातडीची मदत करावी. प्रशासनाने या नुकसान घरांचे पंचनामे करून आदिवासी कुटुंबाला घर दुरुस्त करण्यासाठी मदत करावी.