खेडमध्ये शिवसेनेच्या 'त्या' ६ सदस्यांना ३ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, पक्षाकडून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 15:45 IST2021-06-13T15:45:46+5:302021-06-13T15:45:55+5:30
शिवसेनेच्या सहा सदस्यांना आमिष दाखवून स्वपक्षाच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल करून तो संमत करण्यास केले होते प्रवृत्त

खेडमध्ये शिवसेनेच्या 'त्या' ६ सदस्यांना ३ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, पक्षाकडून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव दाखल
चाकण: पंचायत समितीतील शिवसेनेच्या सहा सदस्यांनी आपल्याच सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. तो संमत करण्यासाठी मतदान करणाऱ्या या सदस्यांनी पक्षविरोधी काम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि गटविकास अधिकारी यांच्या दाखल केला आहे. अशी माहिती शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खेड तालुका शिवसेना प्रमुख रामदास धनवटे, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अमोल पवार, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे आदी उपस्थित होते. चाकण येथे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
खांडेभराड म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या सहा सदस्यांना आमिष दाखवून स्वपक्षाच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल करून तो संमत करण्यास प्रवृत्त केले आहे. महाविकास आघाडीचा धर्म आमदार दिलीप मोहिते यांनी पाळला नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची विविध वक्तव्ये करून खिल्ली उडवत आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबत आमदार मोहीते हे नेहमी चुकीचे बोलत आहेत. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये फूट पाडण्यासाठी आमदार मोहीते चुकीची वक्तव्ये करत आहेत.
"शिवसेनेच्या अंकुश राक्षे, सुभद्रा शिंदे, वैशाली जाधव, सुनीता सांडभोर, अमर कांबळे व मॅचिंद्र गावडे या सहा सदस्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे .तो संमत झाल्यास वरील सहा सदस्यांना ३ वर्षे कोणत्याही निवडणूकित अर्ज दाखल करता येणार नाही. मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार नाही तसेच कार्यकाळ संपल्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करू शकतो" असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.