खेडची प्रशासकीय इमारत मंजूर जागेवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:37+5:302021-04-01T04:11:37+5:30

राजगुरूनगर: शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खेड पंचायत समितीची प्रशासकीय इमारत ...

Khed's administrative building on the sanctioned site | खेडची प्रशासकीय इमारत मंजूर जागेवरच

खेडची प्रशासकीय इमारत मंजूर जागेवरच

Next

राजगुरूनगर: शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खेड पंचायत समितीची प्रशासकीय इमारत मंजूर जागेवरच बांधण्यासाठी तत्त्वत: मंजुरी देण्याबरोबर रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठीही मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आंबेगाव, जुन्नर, खेड व शिरूर तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांना निधी मंजूर करावा यासाठी आग्रही मागणी केली. त्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याशिवाय पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकातून खेड, शिरूर व हवेली तालुक्यांतील गावांना जोडणाऱ्या सुमारे ४५ कोटी रकमेच्या निधीला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. ग्रामविकास योजनेच्या २५१५ शिर्षातून गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५ कोटी निधीची मागणी मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

जुन्नर व चाकण नगर परिषदेसाठी प्रत्येकी १० कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी मागणी करण्यात आली. तसेच जुन्नर तालुक्यातील खानापूर येथे कुकडेश्वर हिरडा प्रक्रिया उद्योगासाठी १० कोटी रुपये मंजूर करणे, आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कुकडेश्वर व खिरेश्वर या प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करणे, चाकण नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणे, राजगुरूनगर व चाकण नगर परिषदांचा विकास आराखडा तत्काळ मंजूर करणे आदी महत्त्वपूर्ण मागण्या केल्याचे त्यांनी सांगितले.

२०१९ मध्ये खेड पंचायत समितीची सुमारे ५ कोटी रकमेची मंजूर नवीन प्रशासकीय इमारतीची जागा जिल्हा परिषदेकडून बेकायदेशीरपणे महसूल विभागाला हस्तांतरित केल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. तत्कालीन आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या या कामाबाबतच्या इत्यंभूत घटनांची माहिती यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निदर्शनास आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा सविस्तर आढावा घेऊन सदर इमारतीचे बांधकाम आहे त्याच ठिकाणी करण्याबाबत तत्त्वतः मान्यता दिली. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, प्रधान सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची मते जाणून घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी लवकरच चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे सकारात्मक संकेत बैठकीत दिले.

या बैठकीस राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती अरगडे, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, स्व. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे व केशव अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वपूर्ण प्रकल्पांना शासनाकडून भरीव निधी

शिरुर लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही. त्याचबरोबर या मतदारसंघातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना शासकनाकडून भरीव निधीची देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कुकडेश्वर हिरडा प्रक्रिया उद्योगासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने गोरे कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला आहे.

Web Title: Khed's administrative building on the sanctioned site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.