शर्यती बंद असल्याने खिल्लारी बैल नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:01+5:302021-08-19T04:13:01+5:30
श्रीहरी प-हाड केंदूर : जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर या कुठल्याही भागाचा तिथल्या शेतकऱ्याचं एक मापक स्वप्न असायचं राहायला चांगले ...
श्रीहरी प-हाड
केंदूर : जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर या कुठल्याही भागाचा तिथल्या शेतकऱ्याचं एक मापक स्वप्न असायचं राहायला चांगले घर असो वा नसो पण घराशेजारी मोठा गोठा असायचा, मात्र ट्रॅक्टर व इतर साधनांमुळे हा खिल्लार जातीचा बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावोगावी बैलपोळ्याच्या सणासाठी बैलच उरले नसून शेतकऱ्यांचा गोठा अडगळीची जागा बनलेले आहे. पांढरा धमक रंग, ऐटबाज शिंगे, काटक उंची, पाणीदार तीक्ष्ण डोळे, ताकदवान शरीर शेतकाम असो किंवा शर्यत ही तगडे बैल सर्वात पुढे असतात. फक्त एकच वैशिष्ट्य म्हणजे हुशार असलेला खिल्लार बैल आपल्या मालकाला मात्र कोठूनही ओळखतो. त्यामुळेच हा बैल शेतकऱ्यांसाठी अभिमान समजला जातो. सुमारे चारशे वर्षांपासून शेतकऱ्यांच्या दावणीला असलेला हा बैल सध्या गावातील ठराविक लोकांच्याच गोठ्यात पाहावयास मिळत आहे. सध्या बैलगाड्यांच्या शर्यती बंद असल्याने तसेच बैलगाड्या इतिहासजमा होत चालल्याने शेतकऱ्यांना बैल संभाळण्याचा खर्चदेखील परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा दावणीला बैल दिसत नाही. सध्या बाहेरच्या राज्यातील गिरसारख्या गाईचं दूध मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. त्यामुळे खिल्लार गाय पाहायलाच मिळत नाहीत. खिल्लार बैल यामध्ये भौगोलिक रचनेनुसार अनेक पोटजाती निर्माण झाले आहेत माणदेशी खिलार, कर्नाटकी खिलार, पंढरपुरी खिलार व नकली खिलार असे वाचून सध्या सातारा व कोल्हापूर या भागात बैलांच्या जाती पाहायला मिळत आहेत.
सध्या बैलगाड्या शर्यतीच्या बंदीमुळे शेतक-यांत मोठी अनास्था असून तमिळनाडूतील जलकूट्टीच्या धर्तीवर राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठण्याची गरज आहे. प्राणिमित्र संघटनेकडून बैला बाबत क्रूरता केल्याचा आरोप केला जात आहे मात्र आपल्या मुलांबाळापेक्षाही शेतकरी आपल्या बैलांना जीव लावत आहे. त्यामुळे बैलगाडा बंदीच्या नादात खिल्लार बैल संपतो की काय, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील पिढीला बैल चित्रातच दाखवण्याची वेळ येईल त्यामुळे आता बैल वाचवा, असं शेतकऱ्यांना म्हणावं लागत आहे.
यावेळी करंदी येथील शेतकरी राहुल बळवंत झेंडे यांनी बोलताना सांगितले की, साहेब आमच्या बैलाला मी कधी शेती सोडून पाहिले नाही. मात्र त्याला पुढे न्यायालयात नेलं आणि आमच्या दावणीचा बैल सोडून घेतला. मला पाहून हंबरणा-या बैलाची आर्त हाक तुम्हाला नाही समजणार. दावणीला असणाऱ्या बैलाची किंमत फक्त शेतकऱ्यालाच माहिती. मात्र आज गोठा रिकामा पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी कोणीच पुसू शकत नाही.
करंदी येथील शेतकरी राहुल बळवंत झेंडे यांनी आपल्या गोठ्यातील खिल्लार बैल फक्त हौसेसाठी ठेवली आहे.
छायाचित्र श्रीहरी प-हाड