आकाशगंगा समूहाची तपशीलवार प्रतिमा टिपण्यात खोडदच्या GMRT ला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:48 PM2023-01-22T15:48:57+5:302023-01-22T15:49:34+5:30

जीएमआरटीत झालेले हे एक नाविन्यपूर्ण संशोधन मानले जात आहे

Khodad GMRT succeeds in capturing a detailed image of a galaxy cluster | आकाशगंगा समूहाची तपशीलवार प्रतिमा टिपण्यात खोडदच्या GMRT ला यश

आकाशगंगा समूहाची तपशीलवार प्रतिमा टिपण्यात खोडदच्या GMRT ला यश

googlenewsNext

खोडद : 'एबेल:२२५६' आकाशगंगा समूहाची तपशीलवार प्रतिमा टिपण्यात पुणे जिल्ह्यातील खोडद (ता.जुन्नर) येथील जीएमआरटीला (जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) नुकतेच यश आले आहे. जीएमआरटीत झालेले हे एक नाविन्यपूर्ण संशोधन मानले जात आहे.

 रेडिओ लहरींचे प्रारण संबंधित दुर्बिणीतून अभ्यासल्यास या आकाशगंगा तसेच त्यांच्या समूहाचे आकारविज्ञान कळण्यास मदत होते. काही वर्षांपूर्वी अद्ययावत केलेल्या जीएमआरटीच्या अधिक संवेदनशील या इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमुळे हे यश मिळाल्याचे मानले जात असल्याचे एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी यांनी सांगितले.

आपली पृथ्वी एका सौरमालेत आहे आणि सौरमाला आकाशगंगेत (मिल्कीवे - मंदाकिनी) आहे. तशाच लाखो आकाशगंगा विश्वामध्ये आहेत. तर हजारो लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगाही समूह स्वरुपात (ग्यालेक्टिक क्लस्टर) आहेत. शेकडो ते हजारो आकाशगंगांचे गुरुत्वाकर्षणाने एकत्रित असलेले समूह विश्वातील प्रचंड अशी रचना मानली जाते.

पृथ्वीपासून दहा हजार प्रकाशवर्षांपेक्षाही दूर असलेला  'एबेल:२२५६' आकाशगंगा समूह त्याच्या जटील संरचनेमुळे ओळखला जातो. या क्लस्टरचे तापमान दहा लाख सेंटीग्रेडपोक्षाही जास्त असल्याचे तसेच 'प्लाझ्मा' म्हणजे पदार्थाच्या चौथ्या अवस्थेतील युक्त अशा वायूंनी भरलेले दिसले आहे. या आकाशगंगा समूहात होत असलेल्या आकाशगंगांच्या टकरी किंवा विलीनीकरणामुळे प्रचंड ऊर्जा मुक्त होते म्हणजे उत्सर्जित होत असते. या ऊर्जेचे उत्सर्जन विद्युत चुंबकीय वर्णपटातील क्ष किरणांपासून रेडिओ लहरीं मधील प्रारणाद्वारे होते. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील खगोलभौतिक शास्त्रज्ञांच्या संघाने या संदर्भात निरीक्षणे केली होती.या शास्त्रज्ञांनी आकाशगंगा समूहातील रेडिओ प्रारणांची निरीक्षणे करण्यासाठी जीएमआरटीसहीत नेदरलँड्समधील ' लो फ्रिक्वेन्सी ऍरे ', अमेरिकेतील ‘ कार्ल जान्स्की व्हेरी लार्ज ऍरे ' या रेडिओ दुर्बिणींबरोबरच ‘एक्सरे मल्टीमिरर न्युटन’ आणि ‘चंद्रा’ या क्ष किरणांद्वारे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणींचीही मदत घेतली होती. मात्र जीएमआरटीच्या अधिक संवेदनशीलतेमुळे अद्याप ज्ञात नसलेल्या आकाशगंगांच्या प्रतिमा टिपता आल्या. 

Web Title: Khodad GMRT succeeds in capturing a detailed image of a galaxy cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.