खोरची ग्रामसभा ठरली वादळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:29+5:302021-03-05T04:12:29+5:30
या वेळी ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. १४ व्या वित्त अयोगातून किती निधी उपलब्ध झाला, तो ग्रामपंचायतने कोठे व कसा ...
या वेळी ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली. १४ व्या वित्त अयोगातून किती निधी उपलब्ध झाला, तो ग्रामपंचायतने कोठे व कसा खर्च केला याचा तपशील द्यावा. यातून चालू असलेली कामे कोणती? कोणत्या घटकासाठी किती निधीची तरतूद होती? असे विचारण्यात आले. खोर गावामध्ये अनेक रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांचे वर्गीकरण कशा पद्धतीने ग्रामपंचायत करीत असून यावर ग्रामपंचायतने काय उपाययोजनांची अंमलबजावणी केली याची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा किती आहे? त्यातील किती घटकांसाठी किती जागावाटप करण्यात आले असून शिल्लक जागा किती आहे? अतिक्रमणांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा. अतिक्रमणधारकांची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतचा एकूण वार्षिक करसंकलन किती आहे? व व्यावसायिकधारकांना कराचे नियम ग्रामपंचायत कशा पद्धतीने हाताळण्यासाठी उपाययोजना करणार याची माहिती द्यावी. ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहे? १५ व्या वित्त आयोग निधी किती व कोणत्या कामे ग्रामपंचायतने मार्गी लावला याचा तपशील देण्यात यावा. खोर ग्रामपंचायतमध्ये दुष्काळी काळात देखील पाण्याचा गैरवापर होत आहे, पाणीचोरीचा दंड ग्रामपंचायत आकारात आहे? का, असे विचारण्यात आले.
सरपंच वैशाली अडसूळ म्हणाल्या की, १५ व्या वित्त आयोग निधीचे वाचन ग्रामसभेत करण्यात आले असून आराखडा तयार करण्यात आला आहे. शंकेचे निरसन देखील करण्यात आले आहे. ग्रामपंचायतचा निकाल लागून अगदी एक महिना झाला आहे. ग्रामसभेत मांडलेली सर्वच प्रश्न हे एकाच वेळी सुटत नसून याचा अभ्यास करून पुढील मासिक मीटिंगपर्यंत प्रश्न सोडविले जातील. ग्रामसभेच्या अगोदर किमान सात दिवस आधी ग्रामपंचायतीच्या प्रश्नांबाबत ग्रामपंचायतला लेखी स्वरूपात अर्ज द्यावा व त्यानंतरच प्रश्नाला उत्तरे दिली जातील. १४ व्या वित्त आयोग कामाचा अखर्चित निधीचा तपशील मासिक मिटिंग मध्ये घेऊन हा प्रस्ताव हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून पुढील कामे केली जातील. खोर गावात सुरू असलेली अवैद्य व्यवसाय लवकरच बंद करण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील, असे सरपंच अडसूळ यांनी सांगितले.
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतची अनेक विषयांवर ग्रामसभा वादळी ठरली गेली. ग्रामसभेत विविध विषयांवर ग्रामसभेत खडाजंगी पाहावयास मिळाली.