खुटबाव ग्रामपंचायत बिनविरोध
By Admin | Published: July 24, 2015 04:43 AM2015-07-24T04:43:44+5:302015-07-24T04:43:44+5:30
१०पंचवार्षिक निवडणुका आतापर्यंत खुटबाग ग्रामपंचायतीने सलगपणे बिनविरोध केलेल्या आहेत.
दौंड : खुटबाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीने बिनविरोधची ५० वर्षांपासून परंपरा जोपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली. गावाच्या एकोप्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. गुलालाची उधळण करीत ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला.
खुटबाव ग्रामपंचायतीने आतापर्यंत १० पंचवार्षिक निवडणुका सलगपणे बिनविरोध केलेल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांचे खुटबाव हे गाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. गावात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन स्थानिक पातळीवर सर्व जाती-धर्मांतील लोक एकत्र आले आणि परंपरेनुसार निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बिनविरोधची परंपरा कायम ठेवण्यासाठी रमेश थोरात यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानुसार उमेदवारांनी कुठलेही आडेवेढे न घेता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज काढून घेतले. त्यामुळे १३ जागा बिनविरोध झाल्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वॉर्ड बिनविरोध झाले होते. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शकुंतला शितकल, मीना चव्हाण, सुनील फणसे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात, खुटबाव सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, सरपंच शुभांगी थोरात, शिक्षकनेते जी. के. थोरात यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.
बिनविरोध झालेले सदस्य
वॉर्ड क्र. १ : शिवाजी थोरात, अशोक चव्हाण, शकुंतला शितकल, वॉर्ड क्र. २ : दशरथ थोरात, कावेरी देशमुख, दत्तात्रय डोमाळे वॉर्ड क्र. ३ : संतोष थोरात, विजय थोरात, सुनीता गिरमे, वॉर्ड क्र. ४ : सुनंदा पवार, मीना चव्हाण, वॉर्ड क्र. ५ : राणी थोरात, सुनील फणसे.