पतीने घरातून हाकलले, ३ दिवस जिन्यात उपाशी राहून पत्नीने केली आत्महत्या; पुण्यातील घटना
By प्रशांत बिडवे | Published: August 30, 2023 05:22 PM2023-08-30T17:22:48+5:302023-08-30T17:24:21+5:30
घरातून बाहेर काढल्यानंतर महिला तीन दिवस उपाशीपाेटी जिन्यामध्येच राहत हाेती...
पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार पेठेत घडली. घरातून बाहेर काढल्यानंतर महिला तीन दिवस उपाशीपाेटी जिन्यामध्येच राहत हाेती.
सुलभा सुरेंद्र पुजारी (वय ४२, रा. वैष्णव अपार्टमेंट, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी (वय ४२), दीर समीर, सासू रजनी पुजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे (वय ४४, रा. गणेशनगर, उस्मानाबाद) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आराेपी सुरेंद्र पुजारी आणि त्यांची पत्नी सुलभा हे दाेघेही पुण्यातील एका नामांकित ज्वेलर्स शाॅपमध्ये सेल्समन म्हणून नाेकरी करीत हाेते. सुलभा या पदवीधर हाेत्या तसेच त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. आराेपी आणि त्यांचे कुटुंबीय सुलभा यांचा छळ करीत होते. शारीरिक, मानसिक त्रासामुळे सुलभा त्रासल्या होत्या. पती सुरेंद्रने सुलभा यांना घरातून हाकलून दिले. सुलभा तीन दिवस सोसायटीच्या जिन्यात राहत होत्या. त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते. तीन दिवसांपूर्वी सुलभा यांनी जिन्याच्या शेजारी असलेल्या खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
बहिणीने आत्महत्या केल्याची माहिती समजताच फिर्यादी पुण्यात आले. पाेलिसांनी केलेल्या चौकशीत सुलभा यांचा छळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर रवी वाघे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक पी. पी. शेडगे हे पुढील तपास करीत आहेत.