बारामतीच्या महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करत माळशेज घाटात फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:19 PM2022-03-24T19:19:58+5:302022-03-24T19:53:29+5:30
बारामती शहरातील घटना
बारामती : मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करत त्याल माळशेज घाटात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहाजणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन बाळासाहेब कदम ( वय २३, रा. वेणेगाव, पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपहरण झालेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मनोज उर्फ बंडू रामदास मुळे (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी) याच्यासह अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या युवकाचे बारामतीतील एका जीममधून अपहरण करून त्याला ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ आंबे कार्नर येथे सोडण्यात आले होते. फिर्यादीनुसार नितीन हा बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेतो. त्याच्याकडे एमएच-४२, एक्स-९२९६ या क्रमांकाची स्कार्पिओ गाडी होती. ती त्याने ओळखीच्या मनोज उर्फ बंडूमुळे याला विकली.
ऑगस्ट २०२० मध्ये नोटरीद्वारे व्यवहार करण्यात आला. गाडी बंडुमुळे याच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, मुळे याने व्यवहार ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिले नाहीत. त्यामुळे फियार्दीने ‘टीटी’ फॉर्मवर सह्या केल्या नाहीत. टेंभुर्णी पोलिस ठाणे व सोलापूरच्या पोलिस अधिक्षकांना त्याच्या विरोधात अर्ज देण्यात आला. या रागातून तो फिर्यादीला धमकावत होता.
दि. २१ मार्च रोजी नितीन हा बारामतीत जीममध्ये व्यायाम करीत होता. यावेळी मुळे हा अन्य पाच साथीदारांसह तेथे आला. त्याने फिर्यार्दीला तु मुलीची छेड काढली आहे, भिगवण पोलिस स्टेशनला चल असे सांगितले. त्यावर फिर्यादीने मी कोणाचीही छेड काढली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही ऐकून न घेता स्कॉर्पिओ गाडीत बसवले. भिगवणकडून करमाळा रस्त्याकडे त्यांनी हे वाहन नेले. तेथे रात्री नऊ वाजता त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. गाडी नावावर करून घेण्यासाठी टी. टी. फॉर्मवर सह्या करण्यास सांगण्यात आले.
फियार्दीने नकार दिल्याने त्यांनी लोखंडी टॉामी डोक्यात मारली. टी. टी. फामवर जबरदस्तीने अंगठा घेत ते गाडीतून खाली उतरले. त्यातील एकाने आणलेल्या रस्सीने फिर्यादीला बांधत त्याच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकण्यात आला. याला मारुन मृतदेह माळशेज घाटात टाकू श अशी चर्चा त्यांच्यात सुरु होती.
मुळे याने फिर्यादीचा गळा रस्सीने आवळल्याने त्यात फियार्दी बेशुद्ध पडला. त्याला जाग आल्यावर तो कोणत्या ठिकाणी आहे हे समजत नव्हते. घाटातून चालत तो पायी वर गेला. तेथे काम सुरु असलेल्या कामगारांनी त्याला हे ठिकाण आंबे कार्नर, माळशेज घाट असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर फिर्यादी एका ट्रकचालकाची मदत घेत लगतच्या टोकावडे पोलिस स्टेशनला गेला. तेथून त्याने कुटुंबियांना फोन करत ही घटना सांगितली.