शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:03 PM2022-07-14T19:03:49+5:302022-07-14T19:04:31+5:30

शिक्रापूर चाकण रस्त्याचे लगत जातेगाव फाटा शिरुर येथील एका भंगार व्यावसायिकाचे कारमधून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Kidnapped scrap dealer in Shirur and demanded Rs 4 lakh ransom | शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी

शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी

googlenewsNext

शिक्रापूर : शिक्रापूर चाकण रस्त्याचे लगत जातेगाव फाटा शिरुर येथील एका भंगार व्यावसायिकाचे कारमधून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाला निर्जनस्थळी घेऊन जात त्याच्याकडून चार लाखांची खंडणी मागणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे, रेहान हसन मोहम्मद खान, अमर दिगंबर दिवसे, आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे, इमरान अजीमूलला खान यांसह एका अल्पवयीन युवकाला अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. याबाबत नसीर अबुबकर खान वय १९ वर्षे रा. खालसा ढाब्याजवळ जातेगाव फाटा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. पचपेडावा ता. तुलसीपूर जि. बलरामपूर उत्तरप्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली

जातेगाव फाटा ता. शिरुर येथील भंगार व्यावसायिक नसीर खान हे ११ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या जेवण करून बसले होते.  काही इसम एका पांढऱ्या कार मधून त्यांच्या जवळ आले. त्यांनी नसीर यांना दमदाटी करत जबरदस्तीने कार मध्ये बसवून निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यांच्या खिशातील सत्तावन हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. यावेळी कार मध्ये नसीर यांना मारहाण करत तुम्ही चोरीचे भंगार घेता आम्हाला चार लाख रुपये द्या असे म्हणत खंडणी मागून एका निर्जनस्थळी सोडून दिले आणि कार मधील सर्वजण फरार झाले.  

शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हे दाखल केले तर याबाबत तपास करत असताना करण उर्फ हनुमंत कांबळे याने सदर गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, मुकुंद कदम, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे यांनी फुलगाव परिसरात सापळा रचला. त्यानंतर करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे रा. सोळु ता. खेड जि. पुणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. 

दरम्यान सदर पथकाने तातडीने रेहान हसन मोहम्मद खान वय ३२ वर्षे, इमरान अजीमूलला खान वय ३० वर्षे (दोघे रा. करंदी रोड गॅस फाटा ता. शिरूर जि. पुणे) अमर दिगंबर दिवसे वय २० वर्षे, आकाश उर्फ डुब्या सोपान पानपट्टे (दोघे रा. आंबेडकर नगर पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी) यांसह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले तर यातील एक साथीदार मारी उर्फ सुरज नागसिंध खंदारे ( पत्ता माहित नाही ) हे फरार आहेत.  तातडीने तपास करत कारवाई करुन आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उपविभाग यशवंत गवारी यांनी अभिनंदन केले असून अटक केलेल्या सर्व आरोपींना शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

Web Title: Kidnapped scrap dealer in Shirur and demanded Rs 4 lakh ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.