पुण्यात मिर्झापूर सिरीज बघून अपहरण, गळा दाबून केला निर्घृण खून; आरोपीला सशर्त जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:33 AM2022-12-06T09:33:48+5:302022-12-06T09:34:34+5:30
आरोपीला ३५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर...
पुणे : मिर्झापूर सिरीज बघून मजेखातर वारजे माळवाडी येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करीत गळा दाबून निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान गोळा केलेला पुरावा हा आरोपीचा जामीन नाकारण्यासाठी पुरेसा नाही. तसेच आरोपींचा कबुलीजबाब हा जामीन नाकारण्यासाठी पुरेसा नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आरोपीला ३५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी हा आदेश दिला.
ही घटना वारजे माळवाडीपोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. मुलगा संध्याकाळी खेळून घरी न आल्याने अल्पवयीन मुलाच्या पालकांनी वारजे माळवाडी पोलिस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी मुलाचे अपहरण करून, त्याचा खून करून, त्याचा मृतदेह वारजे माळवाडीतील डोंगरावर एका फार्महाउसच्या आवारात जमिनीत पुरला आहे असे निष्पन्न झाले.
त्याचप्रमाणे आरोपींनी त्यांच्या मित्राकडे सदर खुनाची कबुलीही दिली होती असे निष्पन्न झाले. ॲड. शुभांगी परुळेकर यांनी आरोपीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आरोपींचा कबुलीजबाब हा जामीन नाकारण्यासाठी पुरेसा नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला. त्यानुसार आरोपीने दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तपास अधिकाऱ्याकडे हजेरी लावावी, असे आदेशात नमूद केले आहे.