काळुसहुन अपहरण केलेल्या चुलत्याचा पुतण्यानेच केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:19 PM2018-05-21T12:19:22+5:302018-05-21T12:19:22+5:30
शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरत आरोपी पुतण्याने चुलत्याचेच अपहरण केले होते. त्यानंतर त्याने चुलत्यावर कोयत्याने वार करत त्यांचा खून केला.
चाकण : खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरून काळूस ( ता.खेड ) येथून अपहरण केलेल्या ७० वर्षाच्या चुलत्याचा पुतण्याने जऊळके गावच्या हद्दीत कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनबा गोविंद खैरे (वय ७०) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव असून त्यांचा मुलगा काळुराम सोनबा खैरे ( वय ३६, रा. काळूस ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय मारुती खैरे ( रा. काळुस, ता.खेड, जि. पुणे ) या पुतण्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रविवारी ( दि.२० मे) अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळुस येथील ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाचे ११ तारखेला अपहरण केल्याची घटना घडली होती. ११ तारखेला सकाळी सोनबा खैरे यांना आरोपी संजय खैरे याने काळूस गावच्या खासगी सामाईक शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये त्याच्या बरोबर सभासद होत नसल्याचा राग मनात धरत स्कॉर्पिओ गाडी क्रमांक ( एम एच १४ - डीए - ५३५३ ) त्यांना बसवून पळवून नेले होते. चाकण पोलीस ठाण्यात या अगोदर सोनबा खैरे हे बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार हे करत आहेत.
========================================