तुझ्या वडिलांना किडनॅप केले, २० हजार अकाउंटवर पाठव! खंडणीसाठी भंगार विक्रेत्याचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:36 AM2024-01-15T09:36:08+5:302024-01-15T09:36:45+5:30
हा प्रकार महंमदवाडी रोडवरील एका सोसायटी येथून १३ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडला....
पुणे : भंगार घेण्यासाठी धुळे येथे जात असलेल्या एका ज्येष्ठ व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३८ वर्षांच्या महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार महंमदवाडी रोडवरील एका सोसायटी येथून १३ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडला.
फिर्यादींच्या ७४ वर्षांच्या वडिलांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे. ते स्क्रॅप घेण्यासाठी धुळे येथे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर, फिर्यादींच्या बहिणीला त्यांचा फोन आला. त्यावेळी ते रडत रडत म्हणाले की, मला २० हजार रुपयांची तत्काळ गरज आहे. त्यावेळी बहिणीने सध्या माझ्याकडे २० हजार रुपये नाहीत, असे सांगितले. वडील का रडत आहेत, याबाबत तिला शंका आल्याने, तिने पुन्हा वडिलांना कॉल करून तुम्ही का रडत आहे, असे विचारले. तेव्हा अचानक वडिलांच्या हातातून कोणीतरी मोबाइल हिसकावला व त्याने मी किडनॅपर बोलत आहे, तुझ्या वडिलांना आम्ही किडनॅप केले असून, तत्काळ २० हजार रुपये त्यांचे अकाउंटवर पाठव, नाहीतर आम्ही त्यांना सोडणार नाही, असे बोलला.
त्यावेळी फिर्यादीचे वडील गुजर साहेब उसके पास पैसा नही है, असे बोलताना त्यांना ऐकायला आले. त्यानंतर, फोन कट झाला. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अजय शिंदे तपास करीत आहेत.