पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या युवकाची बारा तासात सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 06:49 PM2021-03-13T18:49:48+5:302021-03-13T18:51:26+5:30
बारामती शहर पोलीसांची कामगिरी
पाच कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या लीमटेक (ता.बारामती)येथील युवकाची बारा तासात सुखरुप सुटका करण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री या युवकाचे बारामती एमआयडीसी परिसरातून अपहरण करण्यात आले होते. पृथ्वीराज ज्ञानदेव चव्हाण ( वय- २४ ) याने दिलेल्या फिर्यादवरून या ठीकाणी आरोपी सुनिल लक्ष्मण दडस (वय २६), गौरव साहेबराव शेटे (वय २०) तसेच कारचालक संतोष शरणाप्पा कुडवे (रा.चंदननगर,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ७.१५ ते ७.३० च्या दरम्यान जळोची रोड पानसरे ड्रीम सिटी च्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. कृष्णराज धनाजी जाचक(वय १८,) असे अपहरण केलेल्या युवकाचे नाव आहे. चारचाकी मध्ये अज्ञात चार जण आले. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या पायावर बांबूने मारले. त्यानंतर कृष्णराजला जबरदस्तीने गाडीत घातले. सोबत फिर्यादीचा मोबाइल आणि कृष्णराजच्या मोटर सायकलची चावी हिसकावून घेत पळून गेले. तसेच रात्री ९.३७ वाजता कृष्णराजचे वडील धनाजी जाचक यांना कृष्णराजच्या फोनवरून संपर्क साधला. तुझा मुलगा शाळेला पाचगणीला असताना एका मुलीला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केली आहे. तिची सुपारी आम्हाला मिळाली आहे. तू जर पाच कोटी रुपयांची खंडणी एका तासात दिली नाहीतर मुलाला मुकाल अशी धमकी दिली.
याबाबत शहर पोलीसांना माहिती मिळताच क्षणी चार पथकांनी मिळून रात्री शोधमोहिमेला सुरुवात केली. अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाडीचा पिवळ्या नंबर प्लेटवर एमएच १४ असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सीसीटीव्ही कमेऱ्याद्वारे गाडीचा पाठलाग करत मुलाचे वडील धनाजी जाचक यांच्या संपर्कात राहत पोलीस मलवडी येथील डोंगराच्या दरीत पोहचले. या ठीकाणी आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर कृष्णराज याची सुटका करण्यात आली. या प्रकरणात एकुण पाच जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,उमेश दंडीले,पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर पथकाने कारवाईत सहभाग घेतला.