ॲम्युनेशन फॅक्टरीच्या कर्मचाऱ्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:10+5:302021-02-23T04:15:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे गेटवरुन अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे गेटवरुन अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी उधार घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही आणखी पैशाचा तगादा लावत अपहरण करण्यात आले. संबंधिताकडे ५ लाखाची मागणी करत हातपाय बांधून मारहाण देखील करण्यात आली आहे. मारहाण केल्यानंतर कोऱ्या धनादेशावर स्वाक्षरी घेऊन ५ लाखाची रक्कम वटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात संदीप अहिर, रबिल व त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेंजहिल्स येथे रहाणाऱ्या एका ४३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी संदीप अहिर यांच्याकडून औषधोपचाराकरीत ६० हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे त्यांनी व्याजासहित परत केले होते. मात्र तरीही आरोपी त्यांच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत आणखी पैशाची मागणी करत होते. त्यांच्या पतीने आरोपीला स्वत:चे एटीएम कार्ड दिले होते. ते पतीने बंद केल्याचा रागही अहिरला होता. यामुळे तो वारंवार त्यांच्या पतीला फोन करुन पैशासाठी धमक्या देत होता. त्यांनी पैसे न दिल्याने अहिरने त्याच्या साथीदारांच्या फिर्यादी यांच्या पतीचे खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीच्या गेटवरुन १७ फेब्रुवारी रोजी अपहरण केले. यानंतर त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन हातपाय बांधून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडून घेतलेल्या कोर्या धनादेशावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेण्यात आली. यानंतर धनादेश वटवण्यास देऊन तो बाऊन्स करुन घेतला. सहायक पोलीस निरीक्षक कोळी अधिक तपास करीत आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले की, अपहरण झालेल्या व्यक्तीची पत्नी आजारी असल्याने उपचारासाठी त्यांनी पैसे घेतले होते. अपहरण करण्यात आलेली व्यक्ती येथील ॲम्यूनेशन फॅक्टरीत कर्मचारी आहे.