Pune crime: मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण
By नितीश गोवंडे | Published: September 9, 2023 05:34 PM2023-09-09T17:34:34+5:302023-09-09T17:34:45+5:30
येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
पुणे : जावयाच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून देण्यासाठी सासऱ्याने त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने जावयाचे अपहरण केले. पुण्यातून जबरदस्तीने जावयाचे तोंड दाबत त्याला चारचाकीत बसवत थेट बीडला नेले. तेथील एका गोठ्यात दोरीने हात-पाय बांधून डांबून ठेवले. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाईकांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद साहेबराव आडे (२५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार सासरा प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरा रमेश गेमा राठोड यांच्यासह नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड (सर्व रा. शाहुनगर तांडा, पोस्ट बंगाली पिंपळा, गेवराई, बीड) यांनी संगनमताने विनोद आडे यांची पत्नी आर्तिका यांच्या नावावर जमीन करून द्यावी यासाठी त्यांचे अपहरण केल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींच्या या मागणीला विनोद आडे यांचा विरोध होता, त्या कारणावरून ४ सप्टेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास सासऱ्यासह अन्य लोकांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना एका चारचाकी वाहनात बसवले. त्यानंतर त्यांना थेट बीडला नेले. तेथे गेल्यावर एका गोठ्यामध्ये दोरीने त्यांचे हातपाय बांधून डांबून ठेवले. यादरम्यान त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नी आर्तिका हिच्या नावावर जमीन कर नाहीतर तुला मारून टाकेल अशी धमकी देखील दिली.
यानंतर ६ सप्टेंबर रोजी विनोद आडे यांनी सुटका करून घेत, थेट पुणे गाठले. येथे आल्यावर त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात जात याप्रकरणी फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्हि. वाय. होले करत आहेत.