पुणे रेल्वे स्थानक परिसरातून आठ महिन्यांच्या मुलीचे अपहरण; महिला सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:50 PM2018-02-07T16:50:08+5:302018-02-07T16:50:55+5:30
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्गा जवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटूंबातील ८ महिन्याचे बाळ एका महिलेने पळवून नेले. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्ग्याजवळ सोमवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी सांगितले, की ही २८ वर्षाची महिला, तिचा पती व ८ महिन्याच्या मुलीला घेऊन ३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी हडपसर येथे एका ठिकाणी वाढपी म्हणून काम केले. रहायला जागा नसल्याने ते रेल्वे स्टेशन जवळील दर्ग्याजवळ थांबले होते. ५ फेब्रुवारीला त्यांना काही काम मिळाले नाही. रात्री ते दर्ग्याजवळ थांबले असताना एक महिला तेथे आली, तिने त्यांच्याशी बोलत चौकशी केली. नंतर तिने आपल्या भाच्याला बोलून घेतले. मुलीला कपडे दिले व तुम्ही जेवण करून या मी मुलीला सांभाळते असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून ते जेवायला गेले. जेऊन परत आले तर ती बाई व मुलगी तेथे नव्हती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण ती कोठेच न सापडल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता स्टेशन जवळील भुयारी मार्गातून मुलीला घेऊन जाताना दिसून आली. या मुलीच्या शोधासाठी पोलिसांची ४ पथके तयार करण्यात आले असून सर्वत्र शोध घेतला जात आहे, असे मनोज खंडाळे यांनी सांगितले.