प्रेमसंबंधातून व्यापाऱ्याचे अपहरण; आरोपीला राजस्थानहून केली अटक
By विवेक भुसे | Published: December 1, 2022 03:59 PM2022-12-01T15:59:13+5:302022-12-01T15:59:24+5:30
खरेदीचा बहाणा करुन त्यांनी मारहाण करत बोलोरो गाडीतून त्यांना पळवून नेले होते
पुणे: खरेदीचा बहाणा करुन दुकानदाराचे जबरदस्तीने अपहरण करुन घेऊन जाऊन व वसईच्या जंगलात सोडणाऱ्या अपहरणकर्त्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानमधील पाली येथून अटक केली. कैलासराम सोहनलाल जाट (वय ३५, रा. पाली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गाविंद (सर्व रा. जालोर, राजस्थान) यांचा शोध सुरु आहे. प्रेमसंबंधातून हे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
फिर्यादी यांचे मांजरी येथे दुकान आहे. २३ नोव्हेबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण दुकानात आले. खरेदीचा बहाणा करुन त्यांनी मारहाण करत बोलोरो गाडीतून त्यांना पळवून नेले होते. वाटेत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सोडून ते निघून गेले होते. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले. फिर्यादी यांचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहे. या तरुणीचे नातेवाईक राजस्थानमध्ये राहतात. त्यांना याची माहिती मिळाली. त्यातून आरोपी केरळ येथून पुण्यात आले. त्यांनी फिर्यादी याचे अपहरण करुन पुढे वसईजवळ सोडून दिले व त्यानंतर ते राजस्थानला निघून गेले होते.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने केली.