इंद्रायणीनगरमध्ये मुलाला कुत्र्याचा चावा, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:54 AM2018-08-31T00:54:13+5:302018-08-31T00:54:58+5:30
मोकाट कुत्र्यांची दहशत वाढतेय : भोसरी व परिसरातील समस्या
भोसरी : भटक्या कुत्र्यांची भोसरी आणि परिसरात दहशत वाढत आहे. इंद्रायणीनगरमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. गवळीनगर वसाहतीमध्ये ही घटना घडली प्रणय कदम असे या मुलाचे नाव आहे. शहरातील बहुतांश सर्व भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री फिरत असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनस्वार, कामगार यांची पाचावर धारण बसते. रात्री-अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. लहान मुलांनाही मोकाट कुत्र्यांकडून इजा पोहोचल्याच्या घटना घडल्या आहेत. मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्याही लक्षणीय आहे.
रस्त्यावरून सतत धावणाºया कुत्र्यांमुळे अनेकदा अपघातांना आमंत्रण मिळाले आहे. रात्रीच्या वेळी त्यांच्या भुंकण्याने नागरिकांची झोपमोड तर होतेच; त्याबरोबर रस्त्यावरून चालताना असुरक्षितता वाटते. कुत्रे गटागटाने फिरत असल्याने लहान मुलांना तसेच स्त्रियांना रस्त्यावरून चालताना सुरक्षित वाटत नाही. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या खाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. हॉटेल परिसरात, बाजारात कुत्र्यांचा वावर अधिक असतो. कचराकुंडीतील वस्तू खाण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. कचरा कुंड्यांमधील कचरा त्यांच्याकडून अस्ताव्यस्त पसरवला जातो.
‘तो’ प्रस्ताव बासनात
भोसरी औद्योगिक परिसरात कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र, त्यांची संख्या अपुरी आहे. तक्रार आलेल्या सर्वच ठिकाणी त्यांना वेळेत पोहचता येत नाही. महापालिकेची श्वानपथके सकाळी दहा ते पाच या वेळेत काम करतात. मात्र, मोजकीच कुत्री त्यांच्या हाती लागतात. पडलेली कुत्री दूर नेऊन सोडल्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा आपल्या परिसरात फिरताना दिसतात. मध्यंतरीच्या काळात कुत्रे पकडण्याचे काम ठेकेदारी पद्धतीवर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, कालांतराने तो बासनात गुंडाळला गेला.