Kidnay Racket In Pune: किडनी फसवणूक प्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरेंना अधीक्षक पदावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 02:59 PM2022-04-15T14:59:45+5:302022-04-15T14:59:57+5:30
वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला
पुणे : किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणामध्ये ससूनमधील प्रत्यारोपण समिती स्थगित करण्याच्या आदेशानंतर गुरुवारी वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 'लोकमत'ने तावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कोल्हापूर येथील महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे अमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. मात्र त्यानंतर आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने त्या महिलेने पोलीसांत तक्रार दाखल केली. तसेच रुग्णाशी पत्नीचे नाते आहे असे सांगून हे अवयवप्रत्यारोपण करण्यात आले होते. या विषयावर गदारोळ झाल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतर चौकशीसाठी जे. जे. मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली.
ससून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसह 'रुबी हॉल' मधील तज्ज्ञांना चौकशीसाठी मुंबईला बोलावण्यात आले. 'ससून'ची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रत्यारोपण समिती स्थगित ठेवण्याचा आदेश दिले होते. हे प्रकरण अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना चांगलेच भोवले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी बुधवारी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. तावरे यांना अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. तावरे यांनी गुरूवारी पदभार सोडला. ससूनच्या अधिष्ठाता यांना नवीन अधीक्षक पदासाठी पात्र असलेल्यांची नावे पाठवा, असे सांगण्यात आले असून, विभागाकडूनच नवीन अधीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.
अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला
डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करी प्रकरणी आरोग्य विभागाने सुरूवातीला रूबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित केला. त्यापाठोपाठ वैद्यकिय शिक्षण विभागाने चौकशी समिती नियुक्त करत कारवाई केली आहे. अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला आहे. डॉ. तावरे हे त्यांच्या मूळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असतील.
''वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार डॉ. अजय तावरे यांचा अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. पदभार काढण्याचे कारण आपल्या माहित नसून, पदाचा कार्यभार उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे दिला असल्याचे ससून रुग्णालय अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले.''