किडनी तस्करी प्रकरण : रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. परवेज ग्रँटसह 15 जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:49 AM2022-05-12T09:49:50+5:302022-05-12T13:21:53+5:30
रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, युरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सदरे, युरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या डेप्युटी डायरेक्टर मेडिकल रेबेका जॉन, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डॉक्टर संजोग सिताराम कदम यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 चे मार्च 2022 या काळात ग्रँट मेडिकल फाउंडेशन रुबी हॉल हॉस्पिटल या ठिकाणी आरोपी अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने यांनी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केली. हे कागदपत्र त्यांनी ग्रँड मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी सादर केली. या कागदपत्रांची सखोल तपासणी न करता आरोपी रेबिका जॉन, मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ.भुपत भाटे, डॉ. हिमेश गांधी, सुरेखा जोशी यांनी ही कागदपत्रे रीजनल अथोरिझेशन कमिटीकडे पाठवली. रिजनल औथरायझेशन कमिटी, बी जे मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालयाची त्यांनी दिशाभूल करून त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 चे कलम 10 चे उल्लंघन केले. हा सर्व प्रकार रूबी हॉल क्लिनिक येथे घडला.
या सर्व प्रकाराला रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट हे देखील मॅनेजिंग ट्रस्टी या नात्याने तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.