ससूनमधील किडनी प्रत्याराेपण शस्त्रक्रिया तीन वर्षांनी सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 09:20 AM2022-08-25T09:20:20+5:302022-08-25T09:21:20+5:30
सर्वसामान्यांना पुन्हा आवाक्यातील किडणी प्रत्याराेपणाचा मार्ग माेकळा...
पुणे : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर ससून रुग्णालयाची अवयवदान शस्त्रक्रियेच्या मान्यतेची मुदत संपली हाेती. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांनी गेल्या तीन वर्षांमध्ये मूत्रपिंड म्हणजेच किडनी प्रत्यारोपण होऊ शकले नव्हते. बुधवारी येथे किडनी प्रत्याराेपण शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा आवाक्यातील किडणी प्रत्याराेपणाचा मार्ग माेकळा झाला आहे.
ससून रुग्णालयात १९९७ मध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. त्यानंतर नियमितपणे येथे वर्षात सात ते आठ प्रत्याराेपण शस्त्रक्रिया होत होत्या. वेगवेगळ्या कारणांनी काही वर्षांचा त्यात खंड पडला होता. दरम्यान, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे आल्यावर त्यांनी अवयव प्रत्यारोपणाला पुन्हा गती दिली. किडनीबराेबरच त्यांनी यकृत प्रत्याराेपणालादेखील सुरुवात केली हाेती.
आतापर्यंत २१ प्रत्याराेपण
ससून रुग्णालयात सन २०१८ ते २०१९ या दरम्यान २१ मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यापैकी २० रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. सध्या १५ जणांना किडनी लागणार असून, ते या शस्त्रक्रियेसाठी वेटिंगवर आहेत, अशी माहिती मूत्रपिंड शल्यचिकित्सक डॉ. सुरेश पाटणकर यांनी दिली.