मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:39+5:302021-08-27T04:13:39+5:30
पुणे : चॉकलेट, कँडी, जंक फूडशी लहान मुलांची अगदी गट्टी जमलेली असते. मात्र, या पदार्थांमुळे मुलांच्या दातांच्या आरोग्यावर दूरगामी ...
पुणे : चॉकलेट, कँडी, जंक फूडशी लहान मुलांची अगदी गट्टी जमलेली असते. मात्र, या पदार्थांमुळे मुलांच्या दातांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. एकदा दात किडले किंवा दातांमध्ये पोकळी निर्माण झाली, तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दात निरोगी ठेवायचे असतील, तर चॉकलेट्सचा अतिरेक टाळण्याचा सल्ला लहान मुलांच्या दंतचिकित्सकांनी (पेडिॲट्रिक डेंटिस्ट) दिला आहे.
परीक्षेत चांगले गुण मिळाले, एखाद्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली, आईबाबांचे म्हणणे ऐकले किंवा वाढदिवस, अशी कोणतीही कारणे चॉकलेट, कॅडबरी खरेदीसाठी पुरेशी ठरतात. बऱ्याच घरांमध्ये महिन्याच्या सामानातच चॉकलेट, कॅडबरीचे पुडेही भरले जातात. पालकांनीच लावलेली सवय नंतर पालकांसाठीच डोकेदुखी ठरते. त्यामुळे लहानपणापासून मुलांना चॉकलेटचे अतिरेकी सेवन करू न देणेच योग्य ठरते. चॉकलेटसऐवजी मुलांना सुका मेवा, चणे-फुटाणे, मिश्र डाळींचे लाडू, गूळ-शेंगदाणे असे पर्याय अवलंबता येतात.
------------------
चॉकलेट्स, दुधाचे पदार्थ याचप्रमाणे बदलत्या जीवनशैलीसह जंक फूडच्या सेवनानेही दातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दूध किंवा दुधाच्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाने लॅक्टोजचे रुपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होते. त्यामुळे दातांवरील एनॅमलच्या थरावर परिणाम होतो. चॉकलेट, कॅडबरीचे कण दातांना चिकटून राहिल्यास संसर्ग होतो, दातांमध्ये पोकळी तयार होते. दुधाचे दात नाजूक असल्याने ते लवकर खराब होतात. त्यामुळे चॉकलेट खाणे टाळावेच, दूध प्यायल्यानंतरही मुलांना चूळ भरण्यास सांगावे.
- डॉ. राहुल कटारिया, दंतचिकित्सक
---------------------
मुलांना पहिला दात येतो, तेव्हापासूनच दात घासण्याची मुलांना सवय लावावी. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासावेत. मुलांसाठी फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट वापरणे फायद्याचे ठरते. चॉकलेटऐवजी फळे, भाज्या खाल्ल्याने दातांना संरक्षण मिळते. ‘पेडिॲट्रिक डेंटिस्ट’ या संकल्पनेबद्दल आपल्याकडे अद्याप पुरेशी जनजागृती झालेली नाही. लहान मुलांच्या दंतचिकित्सकांकडून मुलांच्या दातांची नियमित तपासणी करून घ्यावी. कमी कीड असतानाच दातांमध्ये थोड्या वेदना असल्या, तरी वेळीच उपचार घेतल्यास पुढचे उपचार टळू शकतात. दातांमधील कीड किंवा पोकळी वाढल्यास नवीन दात पूर्णपणे निरोगी येत नाहीत. बोलण्यामध्येही अडचण येऊ शकते. त्यामुळे लहान मुलांच्या दातांचे आरोग्य उत्तम राखणे गरजेचे असते.
- डॉ. निकिता कुलकर्णी, लहान मुलांच्या दंतचिकित्सक
--------------------
काय काळजी घ्यावी?
- पालकांनी मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवू नये किंवा लाड करायचे म्हणून वारंवार चॉकलेट आणून देऊ नये.
- काहीही खाल्ल्यावर किंवा प्यायल्यावर मुलांना चूळ भरण्याची सवय लावावी.
- सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासण्यास सांगावेत.
- चॉकलेट्सऐवजी सुका मेवा, चणे-फुटाणे, मिश्र डाळींचे लाडू, गूळ-शेंगदाणे असे पर्याय अवलंबता येतात.
- लहान मुलांच्या दंतचिकित्सकांकडून मुलांच्या दातांची नियमित तपासणी करून घ्यावी.