गोळ्या घालून तरूणाचा खून
By admin | Published: June 2, 2015 04:59 AM2015-06-02T04:59:24+5:302015-06-02T04:59:24+5:30
येथे चार अज्ञात हल्लेखोरांनी २८ वर्षांच्या तरुणावर गोळीबार करून निर्घृण खून केला असल्याची घटना आज ( दि. १ जून) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली असून,
चाकण : मुटकेवाडी ( ता. खेड ) येथे चार अज्ञात हल्लेखोरांनी २८ वर्षांच्या तरुणावर गोळीबार करून निर्घृण खून केला असल्याची घटना आज ( दि. १ जून) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली असून, चाकण पोलिसांनी चार अज्ञात फरारी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील व उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राजेंद्र भुरूक (वय २८, रा. मुटकेवाडी, चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळपासूनच अज्ञात हल्लेखोर रोहन यांच्या घरालगत दबा धरून बसले होते. याबाबत त्यांच्या पत्नीने रोहन यांना दोन तरुण आपल्या घराकडे पाहत असल्याचे सांगितले, परंतु कुणीतरी असेल असे म्हणून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी पावणेअकराच्या सुमारास रोहन हे बाहेर जाण्यासाठी घरातून खाली आले असता, त्यांनी बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या दोन तरुणांना 'काय रे पोरांनो इथं काय करता? ' असे हटकले. ते पत्नीने गॅलरीत ऐकले व क्षणार्धात गोळीबाराचा आवाज झाला. हल्लेखोरांनी रोहनवर रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताच्या दंडाला चाटून गेली, तर दुसरी गोळी उजव्या डोळ्याखालून डोक्यात घुसल्याने प्रचंड रक्तस्राव झाला व तो जमिनीवर कोसळला. या वेळी त्यांच्या पत्नीने चार जणांना पळून जाताना पहिले. गंभीर जखमी झालेल्या रोहनला प्राथमिक उपचारासाठी येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक व्यावसायिक-व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चाकण पोलिसांनी चार अज्ञात फरारी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. हा गोळीबार व तरुणाचा खून कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप निष्पन्न झाले नसून, घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
(वार्ताहर)