विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत मारले
By Admin | Published: October 17, 2015 01:16 AM2015-10-17T01:16:16+5:302015-10-17T08:35:07+5:30
गृहपाठ केला नाही आणि पुस्तक घरी विसरले यामुळे कोथरूड परिसरातील पी. जोग शाळेतील एका शिक्षकाने सहावीतील १० ते १५ विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत छडीने मारल्याची घटना शुक्रवारी घडली
पुणे: गृहपाठ केला नाही आणि पुस्तक घरी विसरले यामुळे कोथरूड परिसरातील पी. जोग शाळेतील एका शिक्षकाने सहावीतील १० ते १५ विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत छडीने मारल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यातच पुस्तके घरी विसरलात तर पुन्हा छडीने चोप दिला जाईल, अशी धमकी या शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण द्यावे, विद्यार्थ्यांच्या बालमनावर कोणतीही अपमानास्पद भावना कोरली जाऊ नये याची शिक्षकांनी काळजी घ्यावे, असे शिक्षण विभागातर्फे वारंवार सांगितले जाते. तसेच शासनाने याबाबत कायदेसुद्धा केले आहेत. मात्र, तरीही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा दिली जाते. परंतु, केवळ जागरूक पालकांमुळेच अशा प्रकारच्या घटना समोर येतात.
स्नेहा जोगळेकर यांची मुले पी. जोग शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सहावीतील मुलीला शिक्षकाने हातावर सूज येईपर्यंत मारले. मुलीच्या हातावर लाल रंगाचे वळ उठले आहेत. त्यामुळे जोगळेकर यांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. शाळा बंद झाल्यानंतर शाळा प्रशासनाकडे याबाबतची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे शाळा प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहून नेमकी घटना काय घडली हे समजून घेतले जाणार आहे, असे शाळा प्रशासनाने सांगितले.
संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले जाईल. तसेच त्याच्यावर खासगी शाळा सेवाशर्ती कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्याच प्रमाणे अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना समज देण्यात येईल.
- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग
शाळेकडे याबाबत तक्रार आली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र,वस्तूस्थिती लक्षात घेवून योग्य कारवाई केली जाईल.
- विनिता पुरी, मुख्याध्यापक, पी. जोग स्कूल
माझ्या मुलीचा हाताला सुज आली असून त्यावर मलम पट्टी करावी लागली आहे. पुस्तके घरी विसरला किंवा गृहपाठ पूर्ण करून आणला नाही तर पुन्हा छाडीने मारणार असल्याचे शिक्षकाने धमकावले आहे. त्यामुळे मी शाळेकडे याबाबत तक्रार दिली.
-स्नेहा जोगळेकर, पालक