दुसरं लग्न करण्यासाठी पहिल्या बायकोला औषधे देऊन मारले; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:34 PM2022-11-23T13:34:19+5:302022-11-23T13:34:39+5:30
ही घटना मुळशी तालुक्यामध्ये घडली असून या नराधम पतीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
पिरंगुट (पुणे) : पहिला प्रेम केलेला असतानाही दुसरे लग्न करण्यासाठी नराधन पतीने आपल्या पत्नीचाच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुळशी तालुक्यामध्ये घडली असून या नराधम पतीला पौड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे एका आय.सी.यु. वॉर्डमध्ये स्वप्निल विभिषण सावंत (वय २३ वर्ष रा. सांगवी ता.आष्टी जि.बीड) हा काम करीत होता. काही दिवसांपूर्वी प्रियांका क्षेत्रे (वय २२ वर्ष) या युवतीसोबत त्याचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या पाच महिन्यांपासून कासार आंबोली (ता. मुळशी ) येथे भाड्याने खोली घेऊन ते दोघेही राहत होते. परंतु दरम्यानच्या काळात स्वप्नील सावंतचे हॉस्पिटलमधील परिचारिकाअसलेल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तेव्हा तो तिच्यासोबत दुसरे लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागला.
परंतु पहिले लग्न प्रियांका क्षेत्रे हिच्यासोबत झालेले असल्याने त्याला दुसरे लग्न करता येत नव्हते. केवळ दुसरे लग्न करण्यासाठी आपली पत्नी अडसर ठरत आहे, या विचाराने पत्नी प्रियांकाला राहत्या घरीच ठार मारले. त्यानंतर उपचाराचा बहाणा करीत घोटावडे फाटा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी प्रियंका क्षेत्रे यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषित केले व पौड पोलिसांना अकस्मात मयताची खबर दिली.
परंतु या सर्व घडामोडीनंतर प्रियांका क्षेत्रे हिच्या घरच्यांना धक्काच बसला. तेव्हा त्यांनी आरोपी नराधम नवरा स्वप्निल सावंत याच्याविरूद्ध मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. त्यानंतर पौड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत मोठ्या शिताफीने तपास करत स्वप्निल विभिषण सावंत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिचा खून केला असल्याचे तपासाअंती उघड केले.
आरोपीने थंड डोक्याने केला खून
आरोपी स्वप्निल सांवत याने त्याची पत्नी प्रियांका सावंत हिला जिवे ठार मारण्यासाठी थंड डोक्याने विचार केला. तो काम करीत असलेल्या खाजगी हॉस्पिटल आयसीयूमधून त्याने गुपचूप काही घातक औषधे चोरून घरी आणली. जेव्हा मयत पत्नी प्रियांका क्षेत्रे हिचे डोकं दुखत होतं त्यावेळी उपचार करण्याच्या बहाण्याने त्याने इंजेक्शनद्वारे बीपी लो व शुगर लो होणारे औषध यासह इतर काही औषधे तिच्या शरीरात सोडली. त्यामुळे प्रियंका क्षेत्रे हिचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेबे ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पवन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलिस हवालदार आनंदा बाठे, संदिप सपकाळ, दिपक पालखे, पोलीस नाईक सिध्देश पाटील, प्रशांत बुनगे, नामदेव मोरे, गणेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पाटील यांनी सखोल तपास करून गुन्हा उघडकीस केला आहे. तेव्हा या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस श्रीकांत जाधव हे करीत आहेत.