लैंगिक संबंधाला नकार दिल्याने डोक्यात हातोडा घालून खून!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:56 AM2023-12-17T11:56:43+5:302023-12-17T11:57:08+5:30
पालामधील महिलेच्या मृत्यूचे उकलले गूढ : दुचाकी, २५० सीसीटीव्हींच्या मागावरून गुन्हा उघडकीस
पुणे : बिबवेवाडीत कापडी पालात महिलेचा मृतदेह सापडलेला, चेहऱ्यावर मारहाण केल्याने तिची ओळख पटू शकत नव्हती, मारेकऱ्याची ओळख पटेल असा कोणताही धागादोरा घटनास्थळी मिळाला नाही. मात्र, एक दुचाकी आणि घटनास्थळापासून चाकणपर्यंत तब्बल २५० सीसीटीव्हींवरून माग काढत गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने दोघा संशयितांना पकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
रविसिंग राजकुमार चितोडिया (वय २९, रा. येवलेवाडी, मूळ रा. नाशिक) आणि विजय मारुती पाटील (वय ३२, रा. पालघर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी येथील गोयल गार्डनसमोरील रस्त्याच्या कडेला मॉ आयुर्वेदिक कॅम्प या कापडी पालात ९ डिसेंबर रोजी पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या चेहऱ्यावर मारहाण करून खून करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट ५च्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली. काही अंतरावर एक दुचाकी संशयास्पदरीत्या आढळून आली. या दुचाकीचा चाकणपर्यंत साधारण ५५ किमी माग काढत जवळपास २५० सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यात तांत्रिक विश्लेषणातून रविसिंग चितोडिया याचे नाव समोर आले. त्याला नाशिक येथून पकडले. त्याच्याकडून विजय पाटील याची माहिती मिळाल्यावर त्याला पालघर येथून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी महिलेचा खून केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार अश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने केली.
असा केला खून
गंगाधाम चौकात आयुर्वेदिक औषधांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीचे पाल आहे. ही महिला रात्री तेथे झोपण्यास येत होती. ती मूळची गंगाखेडची राहणारी होती. ९ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता चितोडिया आणि पाटील पालावर झोपायला आले. त्यांनी महिलेला उठवून शरीरसंबंधाची मागणी केली. महिलेने त्याला विरोध केला. त्यात झटापटीत चितोडियाने तेथे पडलेला हातोडा उचलून तिच्या डोक्यात मारला. सकाळी पोलिसांना तिचा मृतदेह मिळून आला.