'आता काय करायचे ते करा', ठाण्यातच पोलिसाच्या कानशिलात; बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील घटना
By विवेक भुसे | Published: May 30, 2023 04:06 PM2023-05-30T16:06:18+5:302023-05-30T16:06:40+5:30
तरुण दुचाकीवरून विनाहेल्मेट जाताना पोलिसांनी त्याला अडवून आरसी बुक व लायसन्स दाखविण्यास सांगितले होते
पुणे : विना हेल्मेट जात असताना थांबविलेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याने आपल्या मैत्रिणीला बोलावून घेतले. पोलिसांबरोबर हुज्जत घालून त्यांच्या कानाखाली मारली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात २८ मे रोजी रात्री पावणेबारा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गौरव हरीष वालावकर (वय २९, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
याबाबत सहायक फौजदार रामदास बांदल (वय ५७) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला विमल विहार सोसायटीजवळ २८ मे रोजी रात्री नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी फिर्यादी, सहायक पोलीस निरीक्षक बरडे व इतर सहकारी हे नाकाबंदी करत असताना गौरव वालावकर हा दुचाकीवरुन विना हेल्मेट जात होता. पोलिसांनी त्याला अडवून आरसी बुक व लायसन्स दाखविण्यास सांगितले. त्याने कोणतीही कागदपत्रे न दाखवता फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घातली. त्याने सुचेता घुले हिला बोलावून घेतले. नंतर पोलीस ठाण्यात त्याला आणल्यावर गौरव याने अचानक फिर्यादी यांच्या कानाखाली मारुन आता काय करायचे ते करा असे बोलून फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आदलिंग तपास करीत आहेत.