सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न
By नम्रता फडणीस | Published: July 31, 2024 04:08 PM2024-07-31T16:08:40+5:302024-07-31T16:08:54+5:30
पती १ गुंठा जागा नावावर करण्यासाठी पत्नीला त्रास देत होता
पुणे : सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी डोक्यात फरशी घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने सासूलाही संपविण्याचा प्रयत्न केला असून, त्यासाठीही त्याला ७ वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायाच्या आहेत. त्याला १५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने शिक्षा सुनावली.
बाळासाहेब जनार्दन चव्हाण (वय ४०, रा. येवलेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी शालन हिचा खून केला. तर, तिची आई (सासू) सुभद्रा विठ्ठल भोजने यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना १३ नोव्हेंबर २०१५ रोजी येवलेवाडी येथे घडली. सासू सुभद्रा यांच्या नावे मंगळवेढा, जि. सोलापूर येथे ५ गुंठा जागा होती. त्यापैकी १ गुंठा जागा नावावर करण्यासाठी तो पत्नी शालनला त्रास देत असे . या त्रासाला कंटाळून ती घर सोडून आई-वडिलांकडे राहत होती. तेथे जाऊनही तो भांडण करत असे. घटनेच्या दिवशी पत्नी अंघोळ करत होती. मोरीमध्ये जाऊन पतीने डोक्यात जड फरशी मारून पत्नीचा खून केला. तर सासूच्या डोक्यात फरशी घातली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. मुलगा आणि मेहुणा त्याला धरण्यासाठी गेले. त्या दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी या प्रकरणात १२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी दोन्ही मुलांची साक्ष महत्त्वाची ठरली.