अनिल देशमुखांसह आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या कारवाया नवीन नाही: शरद पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:26 PM2021-06-25T18:26:30+5:302021-06-25T18:44:59+5:30
देशातील राज्यकर्ते ईडी,सीबीआयसारख्या संस्थांमार्फत त्यांच्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या नेत्यांना अशाप्रकारे त्रास देण्याचे काम करत आहे.
पुणे : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील सुखदा या निवासस्थानी शुक्रवारी(दि.२५) सकाळी ईडीने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. जवळपास तीन तासांच्यावर ही कारवाई सुरु होती. या कारवाईवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या घरावरील ईडीच्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या कारवाईवर मोठं भाष्य केले आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी भेटीच्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. या भेटीनंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनाही विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पवार म्हणाले,अनिल देशमुखांवर अशाप्रकारे कारवाई होण्याची पहिलीच वेळ नाही. त्यांनाच काय आम्हा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना या गोष्टी नवीन नाही. तसेच आम्ही या कारवायांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. मात्र, देशमुखांच्या घरी केलेल्या छापा कारवाईत ईडीच्या हाती फार काही लागलेले आहे असे मला वाटत नाही. पण देशातील राज्यकर्ते ईडी,सीबीआयसारख्या संस्थांमार्फत त्यांच्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्या नेत्यांना अशाप्रकारे त्रास देण्याचे काम करत आहे. जे आजपर्यंतच्या काळात कधीच बघायला मिळाले नव्हते.
तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार आहात का ? शरद पवार म्हणाले..
आघाडीचे नेतृत्व तुम्ही करणार आहात का याबाबत विचारले असता पवार म्हणाले, दिल्लीतील विविध नेत्यांच्या बैठकीबाबत बोलताना आम्ही काही आघाडी बाबत चर्चा करण्यासाठी म्हणून बसलो नाही.जे काही करायचे ते काँग्रेसला बरोबर घेऊनच असे माझे मत असून आधी देखील मी ते जाहीर केले आहे. या बैठकीत आमची नेतृत्वाबद्दल चर्चाच झाली नाही.सामूदायिक नेतृत्व हवे असे मला वाटते. शरद पवारांनी मागे असे बरेच उद्योग केले आहेत. आता मार्गदर्शन सल्ला देणे हे काम करणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा काय म्हणाले...
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य करताना वळसे पाटील म्हणाले, याबाबत जास्त बोलू इच्छित नाही, संबंधित यंत्रणा तपास करत आहे. तसेच भाजपने त्याच्या कार्यकरणीत काय ठरवायचं हा त्यांचा प्रश्न आहे.मुळात आज राज्यामध्ये कोरोनासारखे विषय आहेत,सामजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक प्रश्न आहेत.
सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल
सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करुन केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील नेत्यांवर विनाकारण आरोप करुन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला जाता असल्याचंही राऊत म्हणाले. अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापेमारी केल्याचं कळालं. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय आणि ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? ईडी आणि सीबीआय देशातील प्रमुख संस्था आहेत. पण त्यांची आज बदनामी होतेय हे संबंधितांनी लक्षात घ्यावं.