कायनेटिक कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक
By admin | Published: August 12, 2016 12:59 AM2016-08-12T00:59:16+5:302016-08-12T00:59:16+5:30
चिंचवड येथील कायनेटिक टायझीन इलेक्ट्रिक कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीचे व्यवस्थापक एम. के. माधवन यांनी दिलेल्या
पिंपरी : चिंचवड येथील कायनेटिक टायझीन इलेक्ट्रिक कंपनीची सव्वा कोटीची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कंपनीचे व्यवस्थापक एम. के. माधवन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे कायनेटिक टायझीन इलेक्ट्रिक कंपनीचे कार्यालय असून, एम. के. माधवन हे कंपनीचे व्यवस्थापक आहेत. ही कंपनी तैवान या कंपनीकडून स्टाटर मोटार खरेदी करीत असते. खरेदी केल्यानंतर कंपनीला त्यांच्या खात्यावर पैसे जमा करत असते.
दरम्यान, मे महिन्यात आरोपीने कायनेटिक कंपनीला तैवान कंपनीचा ईमेल हॅक करून एक ईमेल पाठविला. त्या ईमेलमध्ये आरोपीने तैवान कंपनीने पैशांचा भरणा करणारी नेहमीची बँक बदलली असून, मेट्रो बँक लंडन या बँकेच्या माध्यमातून व्यवहार करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार कायनेटिक कंपनीने १९ मे २०१६ ते २० जुलै या कालावधीत मेट्रो बँकेच्या खात्यावर एक कोटी, १८ लाख रुपये जमा केले. मात्र, पैसे भरूनही तैवान कंपनीकडून स्टाटर मोटारचा पुरवठा न झाल्याने, कायनेटिक कंपनीने तैवान कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा कंपनीने व्यवहारासाठी नेहमीचीच बँक असल्याचे सांगितले. त्यानंतर कायनेटिक कंपनीला फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर कंपनीच्या व्यवस्थापकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)