राजगुरुनगर बसस्थानक आवारात खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:25+5:302021-09-09T04:14:25+5:30
राजगुरुनगर आगार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. या आगारातुन रोज शेकडो बसेसची रोज ये- जा असते. ...
राजगुरुनगर आगार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. या आगारातुन रोज शेकडो बसेसची रोज ये- जा असते. हजारो प्रवाशांची या स्थानकात ये जा सुरू असते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, कामानिमित्त राजगुरूनगर शहरात येणारे ज्येष्ठ नागरिक यांची विनाकारण या खड्ड्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एसटी बसेचची सतत वर्दळ असल्यामुळे एसटीचे चाके या खड्ड्यांमध्ये आदळून नागरिक प्रवाशांच्या अंगावर खड्ड्यांतील पाणी उडत आहे.बसस्थानक आवारात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही पायाभूत सुविधा पसल्याने बसस्थानकातील डांबरीकरण उखडून खड्डेच खड्डे पडले आहेत.अतिशय टुमदार अशा या स्थानकात नेहमीच ऐरणीवर येणारा प्रश्न म्हणजे खड्डे. यंदाही आवारात निर्माण झालेल्या खड्ड्यांनी पावसाळ्यात अक्राळ-विक्राळ रूप धारण केले. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांमुळे मोठे डबके निर्माण झाले आहे. या डबक्यांतून बसेस पुढे नेण्यासाठी बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे एसटी चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे एसटी बसेस या खड्ड्यांत आदळत आहे. तसेच आवारात येणाऱ्या दुचाकीस्वरांना या खड्ड्यांचा अंदाज येत दुचाकीस्वार घसरून पडत आहे. स्थानक आवारातील खड्डे बुजवावेत पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.