Kiran Gosavi: किरण गोसावीविराेधात चार तक्रारदार आले पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 09:23 PM2021-10-29T21:23:30+5:302021-10-29T21:25:14+5:30
किरण गोसावी याने चिन्मय देशमुख यांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता
पुणे :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी (kiran gosavi) याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर फसवणूक झालेले लोक आता पुढे येऊ लागले असून, आतापर्यंत चार जणांनी किरण गोसावी याने आमचीही फसवणूक केली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याबाबतचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. किरण गोसावी याने चिन्मय देशमुख यांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गुरुवारी किरण गोसावीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तपासासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले की, किरण गोसावी याने फसवणूक केलेले आज फरासखाना येथे आले होते. यावरुन त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे दिसून येते. देशमुख यांच्याप्रमाणेच काही जणांना त्याने मलेशिया येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. या तक्रारदारांना संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, किरण गोसावी याने आपण फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्या मैत्रिणीच्या नावाने त्याचे बँक खाते उघडले होते. तसेच पैसे स्वीकारण्यासाठी या खात्याचा वापर केल्याचे सांगितले आहे. एका कंपनीच्या नावाने तो ही फसवणूक करत होता. त्याच्या कंपनीची चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील चार तक्रारदार पुढे आले असून त्यातील तिघे लष्कर तर एक जण वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पाठविण्यात आले आहे.
२० दिवस राहावे लागले मलेशियात
किरण गोसावी याने एका तक्रारदाराला मलेशियाला पाठविले होते. तेथे तो २० दिवस राहिला. तरीही नोकरी मिळाली नसल्याने त्याला परत भारतात यावे लागले. त्याचप्रमाणे एका तक्रारदाराला गोसावी याने बनावट विमान तिकीट दिले होते. त्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावरून परत यावे लागले होते