Kirit Somaiya Attack Case: किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील ११ आरोपींना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 06:08 PM2022-02-08T18:08:28+5:302022-02-08T19:04:08+5:30
शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या 12 आरोपींना पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर केले होते
पुणे : भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका परिसरात धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या 12 आरोपींना पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने प्रथम आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र बचाव पक्षाच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सरकारी वकिलांनी त्या अर्जाला विरोध केला. पण या प्रकरणातील गुन्हे जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केल्यानंतर केला. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस.व्ही. दिंडोकर यांनी प्रत्येकी साडेसात हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर अटक केलेल्या आरोपींना जामीन मंजूर केला.
संजय हरिश्चंद्र मोरे, किरण प्रकाश साळी, सुरज मथुराम लोखंडे, आकाश चंद्रकांत शिंदे , रूपेश आनंदराव पवार, राजेंद्र दामोदर शिंदे, निलेश दशरथ गिरमे , मुकुंद पांडुरंग चव्हाण, अक्षय शरद फुलसुंदर, निलेश हनुमंत जगताप आणि सनी वसंत गवते अशी जामीन मिळालेल्या आरोपींचे नावे आहेत.
त्यांच्यासह एकूण 60 ते 70 महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लाटे (वय 30, रा. वडारवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शनिवारी दि. 5 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता हा प्रकार घडला होता.
फिर्यादी हे किरीट सोमय्या यांच्यासह पुणे महानगरपालिका कार्यालयात जात असताना वर नमूद केलेल्या बारा जणांसह 60 ते 70 जणांच्या जमावाने सोमय्या यांना मनपा कार्यालयात जाण्यापासून रोखले. यावेळी एका कार्यकर्त्याने सोमय्या यांना धक्काबुक्की केली आणि पायरीवरून खाली पाडले त्यामध्ये त्यांना दुखापत झाली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाच्या
वतीने सर्वांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने प्रथम न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी वकील सतीश मुळीक, सचिन हिंगणेकर यांनी अर्ज केला. त्यास सरकारी वकिलाने विरोध केला. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असून त्यांना अटक करणे, मुख्य सुत्रधाराबाबत तपास करणे, हा गुन्हा राजकिय स्वरूपाचा असून त्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. न्यायालयाने दोन्ही दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना जामीन मंजूर केला.
आजच दुपारी शिवसैनिकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते
शिवसेनेचे कार्यकर्ते आज स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी यांच्यासह शिवसैनिक आज पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर शिवसैनिकांना थोड्या वेळात न्यायालयात हजर करण्यात आले होते.