कोविड काळात महाविकास आघाडीचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:45 AM2022-08-24T08:45:09+5:302022-08-24T08:50:02+5:30
आमदारांच्या उत्खनन घोटाळ्याचा निकाल लावण्याची मागणी....
लोणावळा (पुणे) : कोविड काळात महाविकास आघाडीने मुंबई, पुणे येथे कोविड सेंटर्स सुरू केली. ती कामे नेते व त्यांच्या नातेवाइकांना दिली. जी कंपनी अस्तित्वात नाही, तिच्या नावे काम दिले. यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला. त्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.
लोणावळा येथे शहर भाजपच्या वतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोमय्या बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, गटनेते देवीदास कडू यांच्यासह सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
सबका नंबर आयेगा...
कोविड काळात महाविकास आघाडीने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसाॅर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. जरांडेश्वर हा बाराशे कोटींचा कारखाना जप्त केला आहे. तत्कालीन पर्यावरणमंत्री यांनी मड आयलँड समुद्रकिनाऱ्यावर २८ स्टुडिओंसाठी परवानगी देत १००० कोटींचा घोटाळा केला आहे, असे विविध आरोप करीत ‘सबका नंबर आयेगा’ असा इशारा सोमय्या यांनी दिला.
आमदारांच्या उत्खनन घोटाळ्याचा निकाल लावा : सुरेखा जाधव
तत्कालीन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी प्रशासक म्हणून काम करताना विनाकारण नगर परिषदेच्या १३ कोटींच्या एफडी मोडल्या आहेत. त्यांची फाइल तयार करून देते, त्यांचा घोटाळा बाहेर काढायचा आहे, असे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी सोमय्या यांना सांगितले. तसेच विद्यमान आमदारांच्या उत्खनन घोटाळ्याचा निकाल लावा, अशी मागणीही जाधव यांनी यावेळी केली.