किरीट सोमय्यांचा विश्वास नांगरे - पाटलांच्या पत्नीवर बेनामी कारखाना विकत घेतल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 12:01 PM2021-11-22T12:01:43+5:302021-11-22T12:01:57+5:30
जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डरमध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत
पुणे : जालना सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी अर्जुन शुगर इंडस्ट्रीकडूनच खोतकर यांनीच तापडिया ग्रुपला ३१ कोटींचा धनादेश दिला. पुन्हा तापडिया ग्रुपकडून तो ४२ कोटींना विकत घेतला. शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनी त्यांचा मुरुडमधला अनधिकृत बंगला स्वत:च पाडला. हे नवे प्रकरण बाहेर काढताना किरीट सोमय्यांनीविश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नीवर देखील आरोप केला आहे. जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डरमध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
सोमय्या म्हणाले, ‘जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डरमध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे मुंबईचे जॉईंट कमिशनर असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी हा बेनामी कारखाना विकत घेतला, असा माझा दावा आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा आणि तोपर्यंत विश्वास नांगरे-पाटलांना पोलीस दलातून मुक्त करा. नांगरे-पाटलांचे सासरे मुळे हे देखील शेअर होल्डर आहेत.’
जालना सहकारी साखर कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, ‘महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटी ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटीस दिल्या गेल्या. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. या कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे आहेत.’