किर्लोस्कर कौटुंबिक वाद ‘कोर्टाच्या पायरी’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:47+5:302020-12-22T04:11:47+5:30
संजय किर्लोस्कर यांनी नुकसान भरपाईसाठी आपल्या भावांकडे साडेसातशे कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांचे भाऊ अतुल, राहुल ...
संजय किर्लोस्कर यांनी नुकसान भरपाईसाठी आपल्या भावांकडे साडेसातशे कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांचे भाऊ अतुल, राहुल आणि विक्रम यांनी याचिका दाखल केली होती. ‘स्थानिक न्यायालयाला या विषयात कोणताही अधिकार नाही आणि कौटुंबिक सेटलमेंटमध्ये निर्णय घेतल्यानुसार हा विषय लवादासाठी पाठवलाा पाहिजे,’ असे त्या तिघांचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने कौटुंबिक सेटलमेंटचे म्हणणे अमान्य केल्याने या दिवाणी खटल्याची सुनावणी आता पुणे न्यायालयात सुरु होणार आहे.
केबीएलमधील समभाग धारकांशी गैरवर्तन केल्याबद्दल आणि मंडळाच्या शिफारशींच्या विरोधात मतदान केल्याबद्दल किर्लोस्कर इंडस्ट्रीजला याच खटल्यात आणण्याच्या अर्जावरही न्यायालय विचार करत आहे. कौटुंबिक सेटलमेंटने निश्चित केले होते की, प्रत्येक किर्लोस्कर कुटुंबासाठी व्यवसायाच्या स्वतंत्र रुपरेषा असतील आणि कुटुंबातील कोणीही थेट किंवा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून इतर कोणत्याही सदस्याशी स्पर्धा करु शकणार नाही. किर्लोस्कर ब्रदर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांच्या म्हणण्यानुसार किर्लोस्कर ब्रदर्सची प्रतिस्पर्धी असलेली पंप उत्पादक कंपनी खरेदी करताना अतुल आणि राहुल (किर्लोस्कर इंजिन) यांनी या नियमाचे उल्लंघन केले. मात्र हे प्रकरण न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचा त्यांचा दावा सिद्ध होऊ शकला नाही.