प्रकट दिनानिमित्त कीर्तन, भजन
By admin | Published: March 2, 2016 12:52 AM2016-03-02T00:52:46+5:302016-03-02T00:52:46+5:30
श्री गजाननमहाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, लिंक रस्ता, काळभोरनगर, जुनी सांगवी या भागातील
निगडी : श्री गजाननमहाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, लिंक रस्ता, काळभोरनगर, जुनी सांगवी या भागातील गजाननमहाराज मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी यानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन झाले.
माघ वद्य सप्तमीला गजाननमहाराज प्रकट दिन साजरा होतो. मंगळवारी पहाटेपासूनच शहरातील गजाननमहाराजांचे मंदिरांत दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७ मधील मंदिरात सोमवारी सकाळी अभिषेक केला.
यानंतर श्री गजानन विजयग्रंथ मंडळाच्या वतीने सामुदायिक पारायण करण्यात आले. वैदेही महिला भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते. सायंकाळी पाचला महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात
आली. मंगळवारी सकाळी काकडारतीनंतर सहाला महाअभिषेक झाला. सकाळी नऊला ‘झंकार महाराष्ट्राचा’ हा महाराष्ट्रातील लोककलांचा आविष्कार संजीवनी महिला शाहिरी पथकाने सादर केला. यानंतर अध्यायवाचन करून महाराजांची आरती झाली. यानंतर ‘स्वर नाद रंग’ या ताल-वाद्यवादन आणि गायनाच्या मैफलीचा लोकांनी आनंद लुटला.
चिंचवडगावातील देऊळमळ्यात अभिषेक, पारायण, गणेशयाग, भजन, भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. याशिवाय महाप्रसाद, धूपारती, कीर्तन याचेही नियोजन करण्यात आले होते. लिंक रस्त्यावरील गजाननमहाराज मंदिरातही सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी दिसून येत होती. यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच निगडी, प्राधिकरणातील अनेक ठिकाणी प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यांना नागरिकांनी प्रतिसाद दिला. (वार्ताहर)४खडकी : येथील डेपोलाइन मित्र मंडळ व नवनाथ महिला भजनी मंडळाच्या कीर्तन सप्ताहाचा समारोप दिलीपमहाराज पायगुडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोमवारी झाली. या वेळी भाविकांनी गर्दी केली होती. मंडळाच्या गणेश मंदिर प्रागंणात झालेल्या कार्यक्रमात पायगुडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सप्ताहामध्ये बाळासाहेब वाळुंज, साहिल शेख, शालकराम खंदारे, सुभाष बडथे, नारायण गोसावी, गजानन जंगले यांचे कीर्तन झाले. अशोक मोरे, विष्णू जाधव यांनी मृदंगावर, साळुंखे यांनी हार्मोनियमवर आणि लक्ष्मीकांत घोडके यांनी वीण्यावर साथसंगत केली. नवनाथ, गौरी, ओंकार, विठ्ठल-रुक्मिणी, अंजली व ज्ञानाई महिला मंडळांने भजन सादर केले. कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती.