’नाट्यसंमेलनाध्यक्ष’ असा उल्लेख नसल्याने कीर्ती शिलेदारांचा कार्यक्रमावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:04 PM2018-06-22T23:04:57+5:302018-06-22T23:04:57+5:30
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कीर्ती शिलेदार यांचा प्रोटोकॉलनुसार ‘नाट्यसंमेलनाध्यक्ष’ असा साधा उल्लेखही करण्यात न आल्यामुळे त्यांनी नाराजीचा सूर व्यक्तकेला आहे.
नम्रता फडणीस
पुणे : ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांची निवड झाल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मात्र बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्याच्या निमंत्रण
पत्रिकेमध्ये कीर्ती शिलेदार यांचा प्रोटोकॉलनुसार ‘नाट्यसंमेलनाध्यक्ष’ असा साधा उल्लेखही करण्यात न आल्यामुळे त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. नाट्यसंमेलनाध्यक्षपदाचे अवमूल्यन झाले असून, त्या पदाची बूज राखली न गेल्यामुळे कीर्ती शिलेदार यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून बालगंधर्व परिवाराच्यावतीने तीन दिवसीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कीर्ती शिलेदार यांचा नाट्य संमेलनाध्यक्ष म्हणून नव्हे तर ‘नांदी: मा. कीर्ती शिलेदार आणि सहकारी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या पुण्यात संगीत नाटकांसाठी शिलेदार कुटुंबियांनी आयुष्य वेचले त्याच कलाविश्वालानाट्य संमेलनाध्यक्ष म्हणून आपली कदर नाही अशा शब्दातं कीर्तीताईंनी ‘लोकमत’शी बोलताना नाराजी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, या कार्यक्रमासाठी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आमंत्रण द्यायला आले तेव्हा ’ तुम्ही नाट्य संमेलनाध्यक्ष आहात, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या’ नाट्य संमेलनाध्यक्ष असल्याने बालगंधर्वांच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला जाणे आपले कर्तव्य आहे असे मानून येण्यास ‘होकार’ दिला. मात्र कार्यक्रमपत्रिका हातात पडली तेव्हा भ्रमनिरास झाला. नांदी कीर्ती शिलेदार आणि सहकारी असा केवळ उल्लेख करण्यात आल्यामुळे नाराज झाले. पुण्याची व्यक्ती नाट्यसंमेलनाध्यक्षपदी विराजमान झाली आहे तर अभिमान वाटायला हवा. मात्र कार्यक्रम पत्रिकेत विशेष उपस्थितांमध्ये सेलिब्रिटीजना स्थान देण्यात आले आहे, परंतु नाट्यसंमेलनाध्यक्षाला डावलले आहे. नाट्य संमेलनाध्यक्षपदाची बूज राखली गेलेली नाही. पत्रिकेमध्ये नावच नसेल तर कार्यक्रमाला का जायचे? असा संतप्त सवाल उपस्थित करीत कार्यक्रमाला जाणारनसल्याचे कीर्ती यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
’ संगीत रंगभूमीसाठी आयुष्य वेचले असूनही, आम्हाला तुच्छतेची वागणूक दिली जाते.बालगंधर्वांची परंपरा जपण्यासाठी पदरचे पैसे खर्च करून आयुष्यभर संगीताची सेवा केली. मात्र बालगंधर्वांच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात ’नाट्यसंमेलनाध्यक्ष’ म्हणून स्थान नाही याचे खरचं वाईट वाटते.
कीर्ती शिलेदार, नाट्यसंमेलनाध्यक्ष
’ कार्यक्रमात कीर्ती शिलेदार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी लावण्यात येणा-या बँनरवरही त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेमध्ये ’नाट्य संमेलनाध्यक्ष’ असा उल्लेख करणे अनावधानाने राहून गेले आहे. त्यांनी दूरध्वनी करून याबाबत नाराजी व्यक्त केली तेव्हा त्यांना पत्रिका बदलतो असे सांगितले आहे. उद्या त्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल-
मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, बालगंधर्व परिवार