किसान रेल्वे सुसाट...आधी डाळींब, तर आता आंब्याची ‘दिल्ली’वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:12+5:302021-05-28T04:09:12+5:30
प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑगस्ट २०२० मध्ये सांगोला रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या किसान रेल्वेचा प्रवास ...
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑगस्ट २०२० मध्ये सांगोला रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या किसान रेल्वेचा प्रवास सुसाट आहे. डाळींब, चिकू, अननस, द्राक्षे, केळी अशा फळांची वाहतूक झाल्यावर आता आंब्याची वाहतूक सुरू आहे. सांगोला, कुर्डुवाडी परिसरातील आंबे थेट दिल्लीला पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी दिल्ली (आदर्श नगर) ला ६ टन आंबे किसान रेल्वेने पाठविण्यात आले आहेत.
किसान रेल्वेला पश्चिम महाराष्ट्रतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत जवळपास २४ हजार ७०९ टन मालाची वाहतूक सोलापूर रेल्वे विभागातील एकट्या सांगोला रेल्वे स्थानकावरून झाली आहे. डाळींब, द्राक्षे व केळी याची मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली आहे. सोलापूर वगळता पुणे, नाशिक, अहमदनगर येथून देखील किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद लाभला. किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकरी आपला माल उत्तर भारत, तसेच पश्चिम बंगाल आदी ठिकाणी पाठवत आहे. किसान रेल्वे अन्य वाहतुकीच्या साधनाच्या तुलनेने जलद व कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
बॉक्स १
कोणत्या फळांची झाली वाहतूक :
किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय झाली आहे. नाशवंत माल जसे डाळींब, सिमला मिरची, केळी, द्राक्षे, पेरू, अननस, पपई, कलिंगड, चिकू, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, पालेभाज्या, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक केली आहे. सर्वांत जास्त वाहतूक द्राक्षेची झाली आहे. द्राक्षे १० हजार ३४८ टन, डाळींब ८५६१ टन व केळी २३९४ टन इतकी वाहतूक झाली आहे.
बॉक्स २
महाराष्ट्रत डाळिंबाचे मोठे उत्पादन :
डाळींब या फळामध्ये प्रभावी पोषक घटक आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मते, डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६२.९१ टक्के ईतका आहे.
कोट : किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेल्वेच्या माध्यमातून शेतकरी आपला माल देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवत आहे. ते देखील जलद. किसान रेल्वेच्या निमित्ताने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आता देशाची बाजारपेठ उपलब्ध झाली. शिवाय रेल्वेने शेतमाल पाठविण्यावर शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले आहे.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग.