किशोर, चांदोबाला लाखो हिट्स : मागील वर्षी झाले ऑनलाईन उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:07 PM2019-09-19T18:07:35+5:302019-09-19T18:08:33+5:30
चांदोबा, चंपक, किशोर, ठकठक या मासिकांनी चिमुरड्यांमध्ये वाचनाची आवड आणि कुतूहल निर्माण करत अनेक पिढया घडवल्या.
पुणे : चांदोबा, चंपक, किशोर, ठकठक या मासिकांनी चिमुरड्यांमध्ये वाचनाची आवड आणि कुतूहल निर्माण करत अनेक पिढया घडवल्या. गोष्टींमधून चिमुरड्यांना रिझवले. सध्याच्या डिजिटल युगात हे अंक वाचकांसाठी पुन्हा एकदा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध झाले आहेत. बालभारतीने मागील वर्षी किशोर मासिक ऑनलाईन उपलब्ध करुन दिले. ऑनलाईन आवृत्तीला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून हिटसने साडेचार लाखांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे, आनंद गिड्डे यांनी वैयक्तिक संग्रहातून १९६० ते २००५ पर्यंतचे चांदोबा चे अंक पीडीएफ पध्दतीने खुले करुन दिले आहेत.
सहजसोपी आणि कलात्मक मांडणी, कविता, कथा, लेखन, आकर्षक चित्रे, खिळवून ठेवणारा मजकूर यामुळे लहान मुलांना कधी एकदा ही मासिके हातात पडतील, नव्याकोऱ्या पानांचा सुगंध घेता येईल आणि मासिके वाचून फस्त करता येतील, याबाबत कमालीची आतुरता असायची. काळ बदलला, चिमुरड्यांच्या आवडी-निवडी बदलल्या, मनोरंजनाची नवी साधने उपलब्ध झाली. वाचनसंस्कृती धोक्याची घंटा वाजवत असताना, दुसरीकडे मुले आणि मासिकांमधील स्नेह मात्र दृढच राहिला.
आताचा जमाना ऑनलाईनचा आहे. काळाची गरज ओळखत मागील वर्षी बालभारतीने ह्यकिशोरह्ण मासिकाचे १९७१ पासूनचे अंक ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिले आहेत. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून वर्गणीदारांची संख्याही वाढली आहे. आता 'किशोर' चे सुमारे ८० हजार वर्गणीदार आहेत, अशी माहिती संपादक किरण केंद्रे यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली. चांदोबा सुरुवातीला तमिळ आणि तेलुगू भाषेत उपलब्ध व्हायचे. त्यानंतर मराठीसह कन्नड, हिंदी, इंग्लिश भाषांमध्येही चांदोबा वाचायला मिळू लागला. मासिकावर अक्षरश: उड्या पडायच्या. अनेक वाचकांनी चांदोबाचे जुने अंक जतन करुन ठेवले आहेत. आनंद गिड्डे या वाचकाकडे १९६०-२००५ पर्यंतचे चांदोबाचे मराठी अंक आणि १९४९-२००६ या काळातील हिंदी अंक उपलब्ध आहेत. त्यांनी सर्व वाचकांसाठी हे अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिले आहेत. लाखो वाचकांकडून त्यांना या अंकाबाबत विचारणाही होत असल्याचे समजते.
-------------
किशोर मासिकांवर वाचकांनी आजतागायत भरभरुन प्रेम केले आहे. वर्षभरापूर्वी मासिक ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आले. ऑनलाईन अंकांना वाचकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. वर्गणीदारांची संख्याही गेल्या वर्षभरात ७-८ हजारांनी वाढली आहे. १९७१ पासूनचे अंक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.