किशोरी आमोणकर यांच्या सुहृदांनी सांगितलेल्या त्यांच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:39 PM2018-02-01T17:39:53+5:302018-02-01T17:45:06+5:30
पुण्यातील रिदम वाघोलीकर या तरुणाने किशोरीतार्इंच्या सुहृदांनी आणि शिष्यांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात उतरवल्या अहेत.
पुणे : हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अखंड तपश्चर्येचे दुसरे नाव म्हणजे गानसरस्वती विदूषी किशोरी आमोणकर. या तेजस्वी आणि परिपूर्ण स्वरांच्या मागच्या किशोरीतार्इंना जाणून घेण्याची सुवर्णसंधी आता संगीत रसिकांना प्राप्त होणार आहे. पुण्यातील रिदम वाघोलीकर या तरुणाने किशोरीतार्इंच्या सुहृदांनी आणि शिष्यांनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या सुरेल आठवणी पुस्तकरुपात उतरवल्या अहेत.
'द सोल स्टिरिंग व्हॉईस-गानसरस्वती किशोरी आमोणकर' नावाचे हे पुस्तक किशोरी आमोणकर यांच्यावर इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या मोजक्या पुस्तकांमधील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. विशेष म्हणजे किशोरीताईंच्या नात तेजश्री आमोणकर यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या गानसरस्वती महोत्सवात ४ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात येणार आहे.
रिदम वाघोलीकर हे युवा संगीत अभ्यासक असून संगीतासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या महान कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक रसिक म्हणून शोध घेणे ही त्यांची विशेष आवड आहे. यापूर्वी त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर 'स्वरलता' हे पुस्तक लिहिले असून ग्रामोफोनच्या आकारात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पुस्तकाने वाचकांची वाहवा मिळवली होती. आता त्यांनी लिहिलेल्या किशोरीताईंवरील या नवीन पुस्तकात ताईंच्या आप्तेष्टांनी व शिष्यांनी सांगितलेल्या आणि सहसा वाचायला न मिळणाऱ्या आठवणी वाचायला मिळणार आहेत. रिदम यांनी या पुस्तकासाठी ठुमरीसम्राज्ञी गिरीजा देवी यांचीही खास मुलाखत घेतली असून गिरीजादेवींच्या स्मरणातील किशोरीताई कशा होत्या हे त्यांनी उलगडले आहे. पुस्तकाची संकल्पना व स्वरूप रचना खडीकर-शहा यांच्या कल्पनेतून साकारले आहे.