किस्सा कुर्सी का? निवडणूक हरली; पण..!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 01:09 PM2024-04-17T13:09:21+5:302024-04-17T13:17:00+5:30
पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या समाजवादी वर्तुळात नानासाहेब म्हणजे फार मोठे प्रस्थ होते....
- राजू इनामदार
नारायण गणेश गोरे म्हटल्यावर फारसे कोणी ओळखणार नाही; पण ना. ग. गोरे म्हटल्यावर लगेच ओळख पटेल. पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या समाजवादी वर्तुळात नानासाहेब म्हणजे फार मोठे प्रस्थ होते. समाजवादी नेते म्हणून तर ते प्रसिद्ध होतेच; पण साहित्यिक म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख होती. पुण्याच्या सनातनी वर्तुळात राहत असतानाही त्यांनी त्या काळात (त्यांचा जन्म १९०७ चा कोकणातील, मृत्यू १९९३) एका विधवा बाईंबरोबर विवाह केला.
वर्ष १९५७ मध्ये नानासाहेब पुण्यातून समाजवादी पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९६२ ला पुन्हा उभे होते; मात्र त्यांचा पराभव झाला. १९७० ते १९७६ राज्यसभा सदस्य होते. मधल्या काळात १९६७-६८ ते पुणे महापालिकेचे महापौर होते. आणीबाणी पर्वात विरोधक म्हणून त्यांनाही तुरुंगवास सहन करावा लागला. जनता पक्षाच्या सरकारमध्ये १९७७ ते ७९ या कालावधीत त्यांनी इंग्लंडमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून काम केले.
कडक स्वभाव
परीटघडीचे पांढरेशुभ्र कपडे, व्यवस्थित दाढी-कटिंग, बोलणे-चालणे एकदम पेठेतील. कडक स्वभावाचे म्हणून ते प्रसिद्ध होते. एका कार्यकर्त्याचा त्यांच्या बाबतीतील अनुभव मात्र वेगळाच आहे. हे कार्यकर्ते म्हणजे भीमराव पाटोळे. पुण्याच्या पूर्व भागात ते समाजवादी पक्षाचे काम करत असत. १९६२ ला नानासाहेबांच्या प्रचारात तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांनी नजरेत भरेल असे काम केले होते. त्यांचे नियोजन, परिसराची माहिती असे बरेच काही नानासाहेबांनी पाहिले होते. त्या निवडणुकीत नानासाहेबांचा पराभव झाला; मात्र नंतर ते राजकारणात सक्रिय होतेच.
चहा प्यायची इच्छा
निवडणुकीनंतर काही दिवसांनी एक सभा होती. पाटोळे तिथेही पडेल ती कामे करत होतेच. नानासाहेबांनी त्यांना बरोबर ओळखले. जवळ बोलावले. ‘तुमच्या घरी चहाला यायचे आहे, कधी येऊ?’ म्हणून विचारले. पाटोळे यांच्यासाठी नानासाहेब म्हणजे मोठा माणूस. ‘कधीही या’. ते म्हणाले. ‘उद्या सकाळी तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे आपण बरोबरच जाऊ.’ नानासाहेबांनी त्यांना सांगितले. पाटोळे त्यावेळी राहायचे घोरपडे पेठेतील एका कॉलनीत. साधे दोन खोल्यांचे घर. तेही वरच्या मजल्यावर.
अंगभूत साधेपणा :
ठरल्याप्रमाणे पाटोळे यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नानासाहेबांचे घर गाठले. नानासाहेब एकदम शुर्चिभूत होऊन बसले होते. त्यांच्याच गाडीतून पाटोळे त्यांना घेऊन घरी आले. घरात वहिनी व अन्य कुटुंबीय होते. नानासाहेब सर्वांबरोबर बोलले. साध्या खुर्चीवर बसून चहा-पोहे खाल्ले. सर्वांची विचारपूस केली. ‘भीमराव चांगला कार्यकर्ता आहे, मन लावून काम करतो, त्याची पक्षाला चांगली मदत होते. त्याला काम करू द्या’ असे बरेच काही त्यांनी घरातल्यांना सांगितले. पाटोळे यांना परत घरी सोडायला सांगितले.
आता हे सापडणे दुर्लभ :
पाटोळे यांनी हे सांगितले त्यावेळी, पराभूत झाल्यानंतरही कार्यकर्त्याला लक्षात ठेवणाऱ्या नानासाहेबांबद्दल गप्पाजीरावांना आश्चर्य वाटले; पण पाटोळे म्हणाले, कार्यकर्त्यांना जपण्यासाठी त्यावेळच्या नेत्यांजवळ हेच होते. प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा. आताच्या निवडणुकांमध्ये नेमके हेच हरवले आहे.
- गप्पाजीराव