किस्सा कुर्सी का: साहेब, तुमच्या सर्किटला मोठं भगदाड पडलंय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:15 PM2024-04-16T13:15:38+5:302024-04-16T13:16:51+5:30
सन १९९१च्या लोकसभा निवडणुकीत गाडगीळ पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार होते....
- राजू इनामदार
बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे फार विद्वान राजकारणी होते. वडील काकासाहेबांनंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांनी त्यांच्याइतकाच दबदबा निर्माण केला होता. बॅरिस्टर म्हणजे बार ॲट लॉ ! या पदवीची परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे. उच्च न्यायालयात काही वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर ही परीक्षा देता येत असे. ती दिल्यानंतर थेट सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करता येत असे. गाडगीळ कायम वरच्या वर्तुळात वावरत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सतत इंग्रजी शब्द येत. कार्यकर्ते त्याचा मराठीत बरोबर अर्थ लावत.
सन १९९१च्या लोकसभा निवडणुकीत गाडगीळ पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार होते. राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने पुण्यातील वातावरण त्यांच्या विरोधात नेले हाेते. गाडगीळ यांना त्याची थोडीफार माहिती होती, त्यांचे कार्यकर्ते मात्र हे सगळे नीट ओळखून होते. गाडगीळ प्रचारात असले तरी कायम दिल्लीच्या संपर्कात ! फोन सुरू असायचे. चर्चा व्हायची. कदाचित अशा चर्चेतूनच एक वाक्य कायम त्यांच्या तोंडून येऊ लागले. सर्किट इज क्लिअर, पिक्चर इज कंप्लेट ! हे ते वाक्य.
कार्यकर्त्यांमध्ये बोलताना गाडगीळ हेच वाक्य बोलत. प्रचारफेरी संपली तरी तेच ! प्रचाराच्या नियोजनाची बैठक संपली तरीही तेच! सर्किट इज क्लिअर, पिक्चर इज कंप्लेट ! गाडगीळांना मतदारसंघाची विशेष अशी खबरबात नसायचीच. त्यांच्या जवळचे तसेच पक्षातील वरिष्ठ जसे सांगतील तसे ते प्रचारात भाग घ्यायचे. सभांमध्ये बोलायचे. कार्यकर्ते त्यांना, ‘काहीतरी गडबड आहे’ असे सांगण्याचा प्रयत्न करायचे; पण तेच इंग्रजी वाक्य बोलून गाडगीळ त्यांना थांबवायचे.
तक्रारीकडे दुर्लक्ष
एकदा शनिवारवाड्यावर सभा होती. राज्यातील त्या नेत्याला मानणारे मतदारसंघातील स्थानिक नेते त्या सभेला गायब होते. त्यांच्या भागातील लोकही नव्हते. सभा संपल्यावर गाडगीळांना काही कामासाठी वाड्यावर जायचे होते. त्यांनी चार-दोन कार्यकर्ते बरोबर घेतले. ड्रायव्हरला बोलावले. गाडीत बसले व निघाले. कार्यकर्ते गाडीत त्यांना सांगू लागले की, ‘साहेब अमुकअमुक सभेला नव्हते. त्यांच्याकडून कोणीही आलेले नव्हते. त्यांची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत. त्यांच्याबरोबर बोलावे लागेल, त्यांना सांगावे लागेल. ते प्रचारात दिसायला हवेत.’
रोखठोक ड्रायव्हर
गाडगीळ हं, हं. करत ऐकत होते. सगळे सांगून संपल्यावर ते लगेच म्हणाले, ‘काही काळजी करू नका, सर्किट इज क्लिअर, पिक्चर इज कंप्लेट!’ हे ऐकल्यावर त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ‘‘साहेब, तुमच्या सर्किटला मोठे भगदाड पडले आहे. ते बुजवायला हवे असे ते सांगत आहेत.’’ मागे बसलेले कार्यकर्ते अवाक् झाले. खुद्द गाडगीळही हे ऐकून चिंतामग्न झाले. ‘नक्की काय झाले आहे?’ असे त्यांनी गंभीरपणे विचारले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गाडगीळ ती निवडणूक हरले. त्याप्रसंगात गाडगीळांबरोबर गाडीत असलेल्या एकाने गप्पाजीरावांना हा प्रसंग सांगितला, त्यावेळी ड्रायव्हरच्या राजकीय हुशारीचे त्यांना कौतुकच वाटले.
- गप्पाजीराव