Pune | किवळे अपघातातील ५ जणांच्या मृत्यूप्रकरणी होर्डिंग मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By रोशन मोरे | Published: April 18, 2023 04:50 PM2023-04-18T16:50:41+5:302023-04-18T16:55:08+5:30
होर्डिंग मालकाने कोणत्याही प्रकारची परवानगी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून घेतली नव्हती...
पिंपरी : पावसाने होर्डिंग पडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर, तिघे जण जखमी झाले. सोमवारी (दि.१७) किवळे येथे बेंगलोर-मुंबई हायवे लगतच्या सर्व्हिसरोडवर ही घटना घडली. विशेष म्हणजे हे होर्डिंग उभारण्यासाठी होर्डिंग मालकाने कोणत्याही प्रकारची परवानगी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून घेतली नव्हती.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सोपान पन्हाळे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी होर्डिंग उभी असलेलेल्या जागेचे मालक नामदेव बारकू म्हसुगडे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणार महेश तानाजी गाडे तसेच या होर्डिंगवर जाहिरात करणारी कंपनी त्या संबंधित इतर जणांवर गुन्हा दाखल केला आहे. होर्डिंग पडून मृत्यू झालेल्यांची नावे शोभा विनय टाक (५०, रा. पारसी रोड, देहूरोड), वर्षा विलास केदारे (५० वर्ष रा. गांधीनगर, देहूरोड), भारती नितीन मंचल (३३, रा. शीतला देवीनगर, मामुर्डी, देहूरोड), अनिता उमेश रॉय (४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (२९, मूळ गाव- महाराजगंज, उत्तर प्रदेश) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी होर्डिंग बसवत असताना पिंपरी-चिंचवड महानगर पोलिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. सोमवारी संध्याकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मुसळधार पावसापासून संरक्षणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर हे होर्डिंग पडले. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. होर्डिंग लावताना आवश्यक परवानगी घेणे आवश्यक होते तसेच सुरक्षितरित्या ते होर्डिंग लावणे आवश्यक होते. मात्र, आरोपींनी कोणतीही खबरदारी घेतली नाही.