उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:45 PM2024-10-24T13:45:55+5:302024-10-24T13:46:11+5:30

काँग्रेसकडून संजय जगताप यांची या निवडणुकीची उमेदवारी फिक्स असल्याने त्यांच्या विरोधात कोण? महायुतीत कोणाला संधी

Knee bashing of aspirants in Purandar for candidacy; A hard-fought match will be played between the alliance and the alliance | उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार

उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग; युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार

जेजुरी : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर हवेली मतदारसंघात युती-आघाडीत दुरंगी सामना रंगणार आहे. तरीही जागावाटपातून ही जागा आपल्याच पक्षाला मिळावी म्हणून सामुदायिक प्रयत्न करतानाच, उमेदवारी मात्र स्वतःला मिळावी, असे प्रयत्न करत अनेक जण मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. परंतु उमेदवारी काेणाला मिळणार, हे गुलदस्त्यात असल्याने उमेदवारीसाठी पुरंदरमधील इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे दिसून येत आहे.

पुरंदर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय जगताप यांची या निवडणुकीची उमेदवारी फिक्स असल्याने त्यांच्या विरोधात कोण? असा प्रश्न तालुक्यातील मतदारांमध्ये आहे. सध्या भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडे मागणी केली आहे. यात भाजप पक्षाकडून इच्छु्कांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाराजे जाधवराव, कात्रज दूध संघाचे माजी संचालक गंगाराम जगदाळे आदींनी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. भाजपचेच गंगाराम जगदाळे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच, असा निर्धार व्यक्त करीत गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील मतदारांना सहली काढून देवदर्शन घडवण्यात येत आहे. तीच पद्धत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनीही अवलंबली आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांना चारा वाटप, देवदर्शन सहली काढून जनमाणसात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना यशही आले आहे. आघाडी झाली तरी ही निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. शिंदेसेनेकडून माजी मंत्री विजय शिवतारे, सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव इच्छुक आहेत. यात विजय शिवतारे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, त्यांच्या तब्येतीचा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांतून चर्चेत येतो. तब्येत साथ देणार का? असा संभ्रमही कार्यकर्त्यांत आहे. यामुळे स्वतः विजय शिवतारे माघार घेऊन विश्वासू व्यक्तीला किंवा कुटुंबातील कोणालाही पुढे करू शकतात, अशीही चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातही जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या महिन्यात आम्हा दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी एकजुटीने काम करू, अशी ग्वाही त्यांनी मेळावा घेऊन राज्यसभेच्या खा. सुनेत्रा पवार यांना दिली आहे. उद्धवसेनेकडून तालुकाप्रमुख अभिजित जगताप, हवेलीतून शंकरनाना हरपळे, संदीप धाडसी मोडक, उल्हास शेवाळे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मनसेसारखा पक्ष तालुक्यात आहे की नाही, असाच प्रश्न यानिमित्त चर्चेत राहिला आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

उरलाय एक महिना फक्त 

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातही झाली आहे. आजपर्यंत एकूण १४ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र ‘आला रे आला, गेला रे गेला’ अशीच स्थिती राहणार आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या उमेदवारीला कोणतीच अडचण नसणार आहे. प्रश्न आहे त्यांच्या विरोधात कोण असणार? आणि हीच चर्चा आजतरी संपूर्ण मतदारसंघात आहे.

Web Title: Knee bashing of aspirants in Purandar for candidacy; A hard-fought match will be played between the alliance and the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.