तरुणांनाही सतावतेय गुडघेदुखीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:56+5:302021-02-08T04:10:56+5:30
दुखापतीमुळे किंवा संधिवातामुळे देखील गुडघेदुखी उद्भवू शकते. शारीरिक कष्टाची कामे करताना तसेच दैनंदिन काम करताना उद्भवणा-या गुडघेदुखीमुळे त्या व्यक्तीला ...
दुखापतीमुळे किंवा संधिवातामुळे देखील गुडघेदुखी उद्भवू शकते. शारीरिक कष्टाची कामे करताना तसेच दैनंदिन काम करताना उद्भवणा-या गुडघेदुखीमुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. ज्या रुग्णांचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे, त्यांना ऑस्टियो आर्थरायटीस आहे आणि पुर्वी हाय टिबियल ऑस्टिओटॉमी (एचटीओ) सारखी समस्या होती, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हाच उत्तम पर्याय आहे.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुनील पिसे म्हणाले, आजकाल तरुण पिढीमध्ये सांधेदुखीसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. व्यस्त जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हा गुडघेदुखीस कारणीभूत ठरतो. गुडघेदुखीसारखी समस्या उद्भवल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत आणखीनच वाढू शकते. सायकलिंग, जॉगिंग, पोहणे आणि नृत्य यांसारख्या क्रिया करण्यासाठी गुडघे प्रत्यारोपणासारखी शस्त्रक्रिया नक्कीच फायदेशीर ठरते. गुडघेदुखी टाळण्यासाठी काही सावधगिरी बाळगल्या पाहिजेत. गुडघेदुखीसरखी समस्या उद्भवणा-या व्यक्तींनी प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम केला पाहिजे. गुडघ्यांमधील वेदनेकडे दुर्लक्ष करू नका. आपापल्या क्षमतेनुसार आणि शरीरानुसार व्यायामाची निवड करा. गुडघ्यांवर अतिरिक्त भार येणार नाही, याची काळजी घ्या. गुडघ्यासंबंधी उद्भवणा-या तक्रारींबाबत त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. योग्य वजन टिकवून ठेवणे तसेच अवजड वस्तू उचलणे टाळा.''
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनिकेत लिमये म्हणाले, ''लिफ्टचा वाढता वापर, कमी अंतरासाठीही मोटारसायकल किंवा मोटार, ऑफिस कँटिनमधील तळलेले मसालेदार पदार्थ, वीकएंडच्या पार्ट्या, सकाळी उशिरा उठण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणे समोर येत आहेत. हल्ली तरुणांमध्ये व्यायामाचे प्रमाण वाढले असे सांगितले जाते. जिममध्ये जाण्यासाठी महागडी फी भरतात. पण रात्रीच्या जागरणांमुळे सकाळी व्यायामाला दांडी पडते. ऑफिसला जायला उशीर होण्याचे कारण स्वतःच्याच मनाला देत व्यायाम टाळतात. अशी एक नव्हे तर असंख्य कारणे यामागे आहेत. तरुणांनी जीवनशैली बदलण्याची नितांत गरज आहे.''
------
काय काळजी घ्यावी?
* आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, बीट, सोयाबीन यांचा समावेश असावा.
* निरोगी आहार आणि व्यायामामुळे आपली हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहतात.
* दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळवा.
* जॉइंट रिप्लेसमेंट हा शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.