लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 01:43 PM2021-06-13T13:43:33+5:302021-06-13T20:25:57+5:30
हवेली तालुक्यातील सांगरुनमध्ये मध्यरात्री घडली घटना, कोरोना लॉकडाऊनमध्ये निघाली होती वरात
पुणे: पूर्ववैमनस्यातून लग्नाची वरात पाहत असलेल्या एकावर सुर्याने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
रफिक इब्राहिम पानसरे (वय ५०, रा. सांगरुन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना १२ जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता सांगरुन गावात घडली. याप्रकरणी साहिल पानसरे (वय २१, रा. सांगरुन, ता़ हवेली) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याचे वडिल सादिक पानसरे व रफिक पानसरे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सादिक आणि रफिक यांचे जुन्या दर्ग्याच्या देखभालीवरुन वाद आहेत. तसेच साहिल यांच्या बहिणीला दोन वर्षांपूर्वी रफिकने शिवीगाळ केली होती. यावरुन त्यांच्यात वाद होता.
सांगरुन गावात १२ जून रोजी मध्यरात्री लग्नाची वरात सुरु होती. सर्व जण तेथे थांबून वरात बघत होते. यावेळी रफिक हा हातात सुरा घेऊन आला. त्याने सादिक याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात व पाठीत सुर्याने भोसकले. त्याला गंभीर जखमी केले. उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून रफिक पानसरे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे अधिक तपास करत आहेत.