मंत्री म्हणतात, कोयता गँगला ठोकून काढा; पोलिसांच्या एफआयआरमधून 'कोयता' गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 12:28 PM2023-03-13T12:28:37+5:302023-03-13T12:28:43+5:30
पुण्यात वेगवेगळ्या भागात दहशत पसरविण्याचे प्रकार घडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले
पुणे : एका बाजूला मंत्री कायदा, सुव्यवस्थेवर बोलताना ‘कोयता गँगला’ ठोकून काढा, असे पोलिसांना सांगत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमधून ‘कोयता’ गायब झाला आहे. गुन्हा करताना वापरलेल्या कोयत्याच्या जागी धारदार अथवा तीक्ष्ण हत्यार असे शब्द आले आहेत. त्यामुळे अचानक कोयता गँग गायब झाली की, गुन्हेगारांनी कोयते वापरणे बंद केले? अशी चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत हे रविवारी पुण्यात आले असताना त्यांनीही पुण्यातील कोयता गँगचा उल्लेख करताना दहशत पसरवणे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे कोयता गँगला ठोकून काढा, असे मी पोलिसांना सांगणार आहे, असे त्यांनी म्हटले.
पुण्यातील गुंडांनी कोयत्याचा वापर करून शहराच्या वेगवेगळ्या भागात दहशत पसरविण्याचे प्रकार घडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते. शहर पोलिसांनी कोयत्यांचा वापर करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. कोयता विकत घेणाऱ्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स घेण्याबरोबर कशासाठी तो ते खरेदी करतो?, याची माहिती घेण्याची सक्ती विक्रेत्यांवर केली.
हत्याराचे उल्लेख टाळण्याचा प्रयत्न
यापूर्वी शहरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये कोणत्या हत्याराचा वापर केला? याचा उल्लेख होत असे. दरम्यान, गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शहरात दाखल गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या हत्यारांमधून कोयता, पालघन अशा हत्यारांचा उल्लेख टाळून फक्त धारदार हत्यार, असे म्हटले जाऊ लागले आहे.
जखम कोणत्या हत्याराने केली? एफआयआर नोंदविताना त्यात वापरलेल्या हत्याराचा स्पष्ट उल्लेख केला गेला पाहिजे. फिर्यादीवर झालेल्या जखमांची डॉक्टरांच्या अहवालात जखम किती खोल, कोणत्या हत्याराने झाली असावी, याचा उल्लेख आवश्यक असतो. अनेकदा पंच उलटतात. त्यामुळे त्याचा फायदा अनेकदा आरोपीला होत असल्याचे ॲड. मिलिंद पवार यांनी सांगितले.
गंभीर गुन्हे कागदावर दिसत नाहीत
आपल्या हद्दीत गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून यावे, म्हणून गंभीर प्रकरणातही किरकोळ कलम लावण्याचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. गंभीर जखमी झालेल्याची पोलिस आयसीयूमध्ये जाऊन फिर्याद घेतात. असे असतानाही कलम मात्र किरकोळ मारहाणीचे लावल्याचे अनेक गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कागदावर दिसताना कमी दिसून येऊ लागले आहे.
फिर्यादीला अनेकदा हत्यार कोणते होते?, हे सांगता येत नाही. तसेच कोयत्यांमध्येही अनेक प्रकार आहे. हत्यार जप्त करताना त्याचा पंचनाम्यात त्याचा सविस्तर उल्लेख केला जातो. त्याच वेळी पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्याला मोकळीक दिली. गुन्हे का वाढले?, याची विचारणा करण्याऐवजी डिटेक्शनवर भर दिला तर गुन्हे लपविण्याचे अथवा तडजोडीचे प्रकार होणार नसल्याचे एक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.